राहता, दि. २० ऑगस्ट २०२६
राहता तालुक्यातील प्रत्येक गावाने आता स्वतःच्या पाण्याचा वैज्ञानिक हिशोब ठेवत भविष्यातील जलटंचाईवर मात करण्यासाठी सज्ज व्हावे, या उद्देशाने केंद्रीय भूजल विभागाने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी ‘राष्ट्रीय जलधर नकाशाकरण आणि जल व्यवस्थापन प्रकल्पाची दमदार सुरुवात झाली. या अनुषंगाने आयोजित टायर-३ प्रशिक्षण कार्यशाळेत १४७ हून अधिक सरपंच, ग्रामपंचायत प्रतिनिधी, अधिकारी, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि जलउपभोक्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
राहतामध्ये आयोजित या कार्यशाळेत केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर प्रत्येक गावाला भविष्यातील पाणीटंचाईपासून वाचविण्यासाठी वैज्ञानिक नियोजनाचा आराखडा कसा तयार करायचा, याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. गावाच्या पाण्याचे उत्पन्न, वापर, भूजलसाठा, पुनर्भरण आणि भविष्यातील गरजा यांचा शास्त्रीय अभ्यास करून जलसुरक्षा आराखडे तयार करण्याची प्रक्रिया यावेळी उलगडून सांगण्यात आली.
यावेळी राहता गट विकास अधिकारी श्री. विवेक गुंड यांनी या प्रकल्पाचे स्वागत करत, स्थानिक प्रशासन या प्रकल्पासाठी भरीव स्वरूपात, सक्रिय सहभाग नोंदवेल अशी ग्वाही दिली. केंद्रीय भूजल विभागाच्या पुणे कार्यालयाचे वरिष्ठ भूजलवैज्ञानिक श्री. उपेंद्र धोंडे यांनी शाश्वत जलव्यवस्थापनासाठी लोकसहभाग, वैज्ञानिक माहिती आणि विविध शासकीय विभागांमधील प्रभावी समन्वय हाच भविष्यातील जलसुरक्षेचा पाया असल्याचे स्पष्ट केले. पंचायत राज संस्था, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या एकत्रित सहभागाशिवाय जलसुरक्षा शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कृषी अधिकारी श्री. पंडीत वाघेरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच दुष्काळमुक्तीचा उद्देश सफल होईल. तांत्रिक सत्रांत श्री. शुभांशू तिवारी, सहायक भूजलवैज्ञानिक यांनी राहता तालुक्यातील या पथदर्शी प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांवर सादरीकरण केले, त्यांनी भूजल विज्ञान, जल अंदाजपत्रक, जलधरांचे स्वरूप तसेच राष्ट्रीय जलधर नकाशाकरण व व्यवस्थापन (NAQUIM) राहता प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.
याव्यतिरिक्त टि. वेंकटगिरी, भू-भौतिकी तज्ञ यांनी भु-भौतिकीशास्त्राचे जल आराखडा निर्माणासाठीचे महत्व विशद केले आणि श्रीमती व्हि. हेमलता , भूजलवैज्ञानिक यांनी जलसंधारण योजनांच्या यशामागील सर्वात मोठा घटक म्हणजे लोकसहभाग असल्याचे अधोरेखित करत ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जलउपभोक्त्यांच्या जबाबदाऱ्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले.
राहता तालुक्यातील प्रत्येक गावाचा वैज्ञानिक जलसुरक्षा आराखडा तयार करण्याच्या दिशेने ही कार्यशाळा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, भविष्यातील पाणी व्यवस्थापन संबंधी दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यासाठीचे महत्व यानिमित्ताने अधोरेखित झाले.
श्री. शुभांशू तिवारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन व्हि. हेमलता यांनी आभार मानले.


