Thursday, August 20, 2026

अंनिस ही प्रश्न विचारणारी व चिकित्सा करणारी तरुण पिढी घडवतेय-विष्णू गायकवाड

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

शेवगाव/प्रतिनिधी

आज सामाजिक चळवळी नामशेष होण्याच्या मार्गावर असून त्याचा गैरफायदा घेत धर्मांध संघटना अत्यंत सूक्ष्म योजनेनुसार तरुणांमध्ये विषारी विचार रुजवून त्यांचे डोके भडकवण्याचे मनसुबे आखत आहेत. अशा कठीण काळात तरुणांना विवेकी विचार, आचार आणि अहिंसात्मक संघर्षाच्या मार्गाने जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी ‘अंनिस’ गेली ३७ वर्षे अविरत प्रबोधन करत आहे. संतांचा आणि समाजसुधारकांचा वैचारिक वारसा पुढे चालवण्यासाठी समाजाने हातात हात घालून काम करण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड यांनी केले.

२० ऑगस्ट रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदान दिनानिमित्त कर्निमयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे निर्मलाताई काकडे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) शाखा शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी गायकवाड यांनी बुवाबाजी विरोधी चमत्कारांची विविध प्रात्यक्षिके सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली आणि त्यामागील वैज्ञानिक कारणे समजावून सांगितली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग दुकळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अंनिस शेवगाव तालुका अध्यक्ष बबनराव धावणे, उपाध्यक्ष चिमाजी धनवडे, डॉ. संजय लड्डा, कार्याध्यक्ष गणेश चेके, सचिव वसंत जगधने, प्रमोद लांडे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम बर्डे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. गणेश चेके यांनी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे जीवनकार्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. तसेच डॉ. संजय लड्डा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ‘अवयवदानाचे महत्त्व’ या विषयावर प्रबोधन केले.
निर्मलाताई काकडे आर्ट्स काॅमर्स अॅड सायन्स कॉलेजमध्ये सलग १३ वर्षांपासून डॉ नरेंद्र दाभोळकर स्मृतिप्रीत्यर्थ विविध कार्यक्रम आयोजित करत असल्यामुळे प्राचार्य डॉ पांडुरंग दुकळे व सर्व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे अंनिस शेवगाव शाखेच्या वतीने कौतुक करण्यात आले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी अंदुरे याच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या नुकत्याच घडलेल्या घटनेचा या कार्यक्रमात सर्व उपस्थितांच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.पांडुरंग दुकळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे महत्त्व विशद करून कार्यक्रमाचा समारोप केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दादासाहेब जवरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिपाली गरड यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार प्रा. वैशाली म्हस्के यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!