भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबांची आज सोमवार दि.३१ ऑगस्ट रोजी यात्रा आहे.
दरवर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवारी।श्रीसंत नागेबाबांची यात्रा भरते.यात्रे निमित्त श्रीक्षेत्र आळंदी येथील गुरुवर्य मिराबाई महाराज मिरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीक्षेत्र नागेबाबा देवस्थानचे अंकुश महाराज कादे यांच्या उपस्थितीत दि.२५ पासून नागेबाबा मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सूरु आहे. सप्ताह काळात
अंकुश महाराज कादे,ज्ञानेश्वर महाराज कदम,वेदांतचार्य देविदास महाराज म्हस्के, उमेश महाराज दशरथे, श्री विठ्ठल महाराज, पोपट महाराज यावलकर यांची कीर्तन झाली.
सोमवार दि.३१ रोजी यात्रेच्या दिवशी संत नागेबाबांचे पादुका व गंगेच्या पाण्याची सवाद्य मिरवणूक काढली जाईल. दुपारी नागेबाबांचे समधीस जलाभिषेक करण्यात येऊन दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आमटीच्या प्रसादाचे वाटप करण्यात येते. सायंकाळी उपस्थित भाविकांना आमटी-भाकरीचा प्रसाद हे यात्रेचे तर गावात एक ही आंब्याचे झाड नाही हे या गावचे वैशिष्टय आहे. गावातील बाहेर गावी नोकरीस असलेली माणसं, लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली यात्रेसाठी आर्वजून उपस्थित राहतात. यात्रेच्या दिवशी रात्री ७ वाजता महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे हरिकीर्तन होणार आहे.
मंगळवार दि.०१ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत गुरुवर्य मिराबाई महाराज मिरीकर यांचे काल्याचे किर्तनाने पारायण सोहळा व यात्रेची सांगता होईल व त्यानंतर आसिफ पठाण,दादासाहेब गजरे, बाबासाहेब वाघडकर व गोरक्षनाथ वाघडकर यांच्या कडून उपस्थित भाविकांना महाप्रसाद पंगत देण्यात येणार आहे.


