राहुरी |पत्रकार राहुल कोळसे:विकसित कृषी आणि विकसित भारताच्या उभारणीत महिला शेतकऱ्यांचे योगदान अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग, आत्मा अहिल्यानगर आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यस्तरीय व विभागीय स्तरावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. “विकसित कृषी व विकसित भारताच्या उभारणीत महिला शेतकऱ्यांची भूमिका” या विषयावरील ही कार्यशाळा डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृह, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहिल्यानगर येथे उत्साहात संपन्न झाली.
या कार्यशाळेला पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला शेतकऱ्यांचे कृषी क्षेत्रातील योगदान वाढविणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे, शेती अधिक शाश्वत व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच कृषी उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.कार्यशाळेत विविध विषयतज्ज्ञांनी महिला शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनवाढीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.डॉ. नारायण मुसमाडे यांनी पिकांवरील कीड व रोगांचे प्रभावी नियंत्रण, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक रोग व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी योग्य वेळी कीड व रोगांचे नियंत्रण करणे आणि एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. उल्हास सुर्वे यांनी शाश्वत शेती अभियान, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे महत्त्व, पर्यावरणपूरक शेती पद्धती आणि त्यासाठी उपलब्ध विविध तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. शेतीची उत्पादकता टिकवून ठेवतानाच नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्यावर त्यांनी भर दिला.
डॉ. सचिन नलावडे यांनी महिला शेतकऱ्यांचे श्रम आणि वेळ कमी करण्यासाठी सुधारित कृषी अवजारांचा वापर, कृषी यांत्रिकीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची उपयुक्तता याविषयी माहिती दिली.
डॉ. विक्रम कड यांनी महिला कृषी उद्योजकतेच्या विविध संधी स्पष्ट करताना कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग, उत्पादनांचे प्रभावी विपणन आणि शेतीपूरक व्यवसायांबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी शेतीसोबत प्रक्रिया उद्योग आणि कृषी आधारित व्यवसायांकडे वळल्यास आर्थिक सक्षमतेच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सचिन नलावडे, अधिष्ठाता, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी हे उपस्थित होते. प्रदीप लाटे, प्रकल्प संचालक, आत्मा, अहिल्यानगर यांनी मार्गदर्शक म्हणून सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळनाथ सोनवणे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, अकोले यांनी केले.
कृषी विभाग व आत्माच्या अधिकाऱ्यांचे योगदान
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विभाग आणि आत्माच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले. यामध्ये सुजित गायकवाड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुरी,अविनाश निर्मळ तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कोपरगाव, प्रवीण गोरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नगर शैलेश आहेर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नेवासा वैभव कानवडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक संगमनेर राजदत्त गोरे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहाता उमेश डोईफोडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक नगर आणि सुनील म्हस्के, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक शेवगाव यांचा समावेश होता.
महिला शेतकऱ्यांसाठी ठरली मार्गदर्शक कार्यशाळा
या कार्यशाळेमुळे महिला शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, कृषी यांत्रिकीकरण, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग आणि विपणन याविषयी उपयुक्त माहिती मिळाली. शेतीतील उत्पादनवाढीसोबत आर्थिक उत्पन्न वाढविणे, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करणे आणि कृषी उद्योजकतेच्या नव्या संधी शोधणे यासाठी ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरली.महिला शेतकऱ्यांचा कृषी विकासातील सहभाग अधिक सक्षम करून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे आणि त्यांच्या योगदानातून विकसित कृषी व विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करणे, या दृष्टीने ही राज्यस्तरीय कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली.


