नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील सौंदळा ग्रामपंचायतला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत ३० लाख रुपयांचा जिल्हास्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस, कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून राज्यात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यास संदर्भ मान्यता देण्यात आलेली आहे. सन २०२५-२६ या करिता अभियानाचा कालावधी दि.१७.०९.२०२५ ते दि.३१.०३.२०२६ असा निश्चित करण्यात आला होता. अभियान कालावधीत ग्रामपंचायतींनी केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन करुन पुरस्कारासाठी निवड करण्याकरिता तालुका, जिल्हा, महसूली विभाग व राज्यस्तरावर मुल्यमापन समित्या गठीत करण्यात आल्या होत्या.
या अभियानात सहभागी ग्रामपंचायतींचे तालुकास्तरीय मुल्यमापन समितीमार्फत मुल्यमापन करून प्रत्येक तालुक्यातून प्रथम दोन ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय मुल्यमापनासाठी निवड करण्यात आली. त्यानंतर, जिल्हास्तरीय मुल्यमापन समितीमार्फत या ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करून प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम दोन ग्रामपंचायतींची विभागस्तरीय मुल्यमापनासाठी निवड करण्यात आली. त्यानंतर विभागस्तरीय मुल्यमापन समितीमार्फत या ग्रामपंचायतींचे विभागस्तरीय मूल्यमापन करण्यात आले. त्यामधून प्रत्येक महसूली विभागातून दोन ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय मुल्यमापनासाठी निवड करण्यात आले होते.
विविध स्तरावरील मुल्यमापनाअंती ग्रामपंचायतींना प्राप्त गुणांकनाच्या आधारे सर्वाधिक गुणांकन प्राप्त ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच, वरिष्ठ स्तरावरील पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींचा कनिष्ठ स्तरावरील पुरस्कारासाठी विचार न करता, त्यानंतरच्या पात्र ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे, वरिष्ठ समितीने तपासणी केलेल्या ग्रामपंचायतींचा क्रम वरिष्ठ समितीच्या गुणांकनानुसार निश्चित करण्यात आला आहे.
यात अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कासारपिंपळगाव ता. पाथर्डी(प्रथम क्रमांक ५० लक्ष रुपये), ग्रामपंचायत सौंदाळा ता. नेवासा (द्वितीय क्रमांक ३० लक्ष रुपये) व ग्रामपंचायत हिवरे बाजार ता. अहिल्यानगर (तृतीय क्रमांक २० लक्ष रुपये) या ग्रामपंचायतींची मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत सन २०२५-२६ करिता जिल्हास्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
सौंदाळा ग्रामपंचायतने जिल्हास्तरावरी ३०लक्ष रुपयांचा द्वितीय क्रमांक पटकावल्याने लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांच्यासह उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.


