माय महाराष्ट्र न्यूज: मेडिकलशी संलग्नित सुपर स्पेशालिटीत जोखमीच्या शस्त्रक्रिया होत असल्याने सुपरला स्वतंत्र रक्तपेढी देण्यात आली. मात्र, या रक्तपेढीत होल ब्लड (संपूर्ण रक्त) उपलब्ध असते.
यामुळे रुग्णांना रक्तघटकासाठी मेडिकल अथवा खासगीतील रक्तपेढ्यांचा रस्ता धरावा लागतो. परंतु लवकरच आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज रक्त विघटन प्रकल्प पूर्णत्वास येत असल्याने ‘रक्त उपलब्ध
नाही’ असे शब्द रुग्णांच्या नातेवाइकांना ऐकावे लागणार नाही.मेंदू, हृदय, पोटाच्या विकारावरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसह किडनी प्रत्यारोपणासारख्या जटिल, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुपरमध्ये होतात.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रक्त विघटन प्रकल्प उभारण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २०१७ मध्ये दिले होते; परंतु याकडे वैद्यकीय शिक्षण विभागासह स्थानिक प्रशासनानेदेखील
दुर्लक्ष केले. मेडिकलमधून उसनवारीवर सुपरमध्ये रक्तघटक आणले जातात. मेडिकलमध्ये रक्तघटक उपलब्ध नसल्यास सुपरच्या विविध विभागातील रुग्णांना खासगीचा रस्ता धरावा लागायचा; मात्र नुकतेच नागपुरातील
अन्न व औषध विभागाने सुपरमधील रक्तपेढीला रक्तविघटन प्रकल्प उभारण्यासंदर्भातील मंजुरी दिली. अधिष्ठात्यांच्या आर्थिक अधिकारातील काही यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली. काही यंत्र खरेदी प्रक्रिया सुरू आहे.रक्त विघटन प्रकल्पांतर्गत
रक्तदात्यांकडून गोळा झालेल्या रक्ताचा चार पद्धतीने उपयोग करता येईल. रक्तातील घटक वेगवेगळे करून रुग्णांना गरजेनुसार त्याचा पुरवठा केला जाईल. त्यामुळे एक युनिट पिशवीतून चार रुग्ण एकाच रक्तदात्याकडून
लाभार्थी ठरू शकतील. महिनाभरात हा प्रकल्प सुरू होईल. रक्तातील पांढऱ्या पेशी, लाल पेशी, प्लेट्लेट्स आणि प्लाझा हे चार घटक वेगवेगळे करण्याच्या क्रियेला रक्त विघटन म्हणता येते. रुग्णाला आवश्यक असलेला
घटक देण्याची सोय या प्रकल्पातून होणार आहे. यामुळे रक्त घटकासाठी रुग्णांची आर्थिक फरपट होणार नाही. याशिवाय त्यांची भटकंती सुद्धा थांबेल.