माय महाराष्ट्र न्यूज: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात रविवारी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच
मंत्री समितीने तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी दिली आहे. या निर्णयावर टीका करताना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, बंदी
सरसकटच उठवायला हवी, अशी भूमिका मांडली आहे.अंबादास दानवे म्हणाले, महाराष्ट्रात साधारण एक लाख हेक्टरवर 25 ते 30 लाख टन कांद्याचे उत्पादन निघते. यातील साधारण 13 लाख टन कांदा
देशांतर्गत वापरला जातो. मग उरलेल्या 12 ते 17 लाख टन कांद्यापैकी फक्त 3 लाख टनांची निर्यात करणे हे कोणत्या न्यायात बसते? उरणारा कांदा काय केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा आणि त्यांच्या
सहकारी मंत्र्यांच्या घरी पाठवायचा का? असा सवाल त्यांनी केला आहे.शेतकऱ्यांची कांदा विक्री आटोपत आलेली आहे. असे असताना निर्यातीचा निर्णय निव्वळ व्यापाऱ्यांच्या फायद्याचा ठरणार आहे,
शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाही. बंदी सरसकटच उठवायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली.दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात कांद्याचे दर घसरले आहेत. त्यासोबतच इतर भाज्यांच्या किमतीतही घट होत चालली आहे.
त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. ही निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत होती. मात्र सरकारने त्याआधीच निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
तथापि, केवळ तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी दिली आहे.