नेवासा/प्रतिनिधी
राज्यस्तरीय महामंडळ अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) युवा नेते अब्दुल शेख यांचे नाव सध्या प्रबळपणे चर्चेत आहे.
श्री.शेख हे पक्षाशी एकनिष्ठ राहून, संयमी व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेत त्यांनी अल्पावधीतच आपली ठसा उमटवणारी ओळख निर्माण केली आहे. २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीतील सर्वात कमी वयाचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांची उमेदवारी घोषित झाली होती. मात्र, राजकीय समजूतदारपणा आणि समयसुचकता दाखवत त्यांनी उमेदवारी मागे घेत, महायुतीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल लंघे यांना पाठिंबा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे मतविभाजन टळून महायुतीच्या विजयात निर्णायक भूमिका बजावता आली.या धाडसी आणि परिपक्व भूमिकेचे उच्चपदस्थ नेत्यांकडून कौतुक झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचा विशेष उल्लेख केला.अब्दुल शेख हे जात-पात विरहित राजकारणाचे उदाहरण ठरले आहेत. ज्येष्ठ नेत्यांच्या स्पर्धेत असूनही, राष्ट्रहित आणि कार्यक्षमतेच्या आधारे अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी बहाल केली होती. ती उमेदवारी त्यांनी विना संकोच राष्ट्रहितासाठी परत केली. ही भूमिका सर्व राजकीय वर्तुळात आजही चर्चेचा विषय ठरते आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या असून, ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांच्या कार्याची स्वतः पालकमंत्री विखे पाटील यांनी दखल घेतली आहे. तसेच, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतही त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे.
राजकीय समन्वय, जनसंपर्क, पक्षनिष्ठा आणि नेतृत्वगुण यांचा सुरेख संगम असलेले अब्दुल शेख हे राज्यातील नव्या दमाचे नेतृत्व म्हणून उदयाला येत आहेत. त्यामुळेच त्यांचे नाव महामंडळ अध्यक्षपदासाठी चर्चेत असून, त्यांच्या नेमणुकीने राज्याला एक विश्वासार्ह, सक्षम आणि सकारात्मक नेतृत्व मिळेल, अशी भावना विविध राजकीय व सामाजिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.