नेवासा/ प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील माता घोडेश्वरी फर्निचर्स या तीन मजली दुकानाला बुधवार दि.१९ रोजी रात्री १०:३० वाजता लागलेल्या भीषण आगित संपूर्ण दुकान आगीत भस्मसात होऊन सुमारे कोट्यावधि रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.दरम्यान वीजेच्या शार्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबद अधिक माहिती अशी की,
घोडेगाव येथील सचिन चोरडिया व सुजित चोरडिया यांच्या माता घोडेश्वरी फर्निचर्स या तीन मजली दुकानाला
बुधवार दि.१९ नोव्हेबर रोजी रात्री १०:३० वाजता भिषण आग लागली. या आगीत दोन दुकाने भस्मसात. दोन वर्षांपूर्वीच हे फर्नीचरचे नविन अद्ययावत दुकान सुरु केले होते. या घटनेत दुकानात असलेले फर्निचर, विद्युत उपकरणांचे मोठे स्फोट झाले. आग इतकी भीषण होती की ती एक किलोमीटर अंतरावरूनही दिसत होती.
घटनेची माहिती मिळताच गावातील युवक आणि ग्रामस्थ धावून आले व आग विझवण्यास मदत केली.
सर्वप्रथम शनिशिंगणापूर देवस्थानची अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र आग मोठी असल्याने तिचा मर्यादित परिणाम झाला. त्यानंतर युवा नेते उदयन गडाख यांनी तत्काळ भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखाना व मुळा कारखान्याच्या अग्निशामक बंब पाठवण्याच्या सूचना दिल्या. नेवासा येथील आग नियंत्रणात आणून तेथील सर्व अग्निशमन बंब तातडीने घोडेगावला पोहोचल्या.
यानंतर अहिल्यानगर महानगरपालिकेची अत्याधुनिक गाडी, त्यानंतर पाथर्डी, श्रीरामपूर व राहुरी नगरपालिका यांचे बंब घटनास्थळी दाखल झाल्या. या सर्व दलांनी मिळून पहिला व दुसरा मजला नियंत्रणात आणला. मात्र तिसऱ्या मजल्यावर आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने बचाव कार्य कठीण झाले होते. मधून मधून पाणी संपत असल्याने गाड्या पुन्हा भरून येईपर्यंत आग भडकत होती.
घटनेची माहिती मिळताच आमदार विठ्ठलराव लंघे, युवा नेते उदयन गडाख, तहसीलदार बिराजदार यांनी रात्रिच घटनास्थळी भेट दिली. सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय माळी व आशिष शेळके यांनी वाहतूक नियंत्रण ठेवून अग्निशामक दलांना सहकार्य केले. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घोडेगाव व परिसरात भव्यदिव्य मानल्या जाणाऱ्या या दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाल्याने व्यापारी वर्गासह नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे. अधिकृत तपास व नुकसानीचा अंतिम अहवाल पुढील काही दिवसांत अपेक्षित आहे.


