नेवासा/प्रतिनिधी
आमदार लंघे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मुळा धरणातून उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी सोमवार दि. ५ जानेवारी पासून आवर्तन सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
याबाबद अधिक माहिती देताना आ.लंघे यांनी सांगितले की,
मागील अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला होता सध्या ऊसतोड सुरू असल्याने खोडवा ऊस, नवीन लागवड झालेला ऊस तसेच रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा आणि चारा पिकांना पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली होती. याबाबत नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती.
शेतकऱ्यांची ही तीव्र मागणी आमदार लंघे पाटील यांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना समक्ष पणे भेटून यांच्याकडे प्रभावीपणे मांडली.
शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने मुळा पाटबंधारे विभागाला शेतीसाठी आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार उजव्या कालव्यातून पाणी सोडणार आल्याची माहिती कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली.
मुळा धरणातून उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी सोमवार दि. ५ जानेवारीपासून पाणी सोडण्यात येणार आहे. पुढील ३० दिवस हे आवर्तन सुरू राहणार असून या कालावधीत सुमारे ३ टीएमसी पाणी शेतीसाठी उपलब्ध होणार आहे. पहिल्या दोन दिवसांत ७०० क्युसेक वेगाने पाणी सोडले जाणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाण्याचा वेग वाढविण्यात येणार आहे.
या आवर्तनाद्वारे लाभक्षेत्रातील सोसायट्यांच्या माध्यमातून सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्राला पाणी देण्यात येणार आहे. पाणी गळती टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून आवश्यक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.
मुळा धरणातून सुरू झालेल्या या आवर्तनामुळे रब्बी पिकांसह उसालाही दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाल्याची भावना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.


