Wednesday, March 11, 2026

डॉ.संदीप वासलेकर यांना यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा कृतज्ञता पुरस्कार जाहिर

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील सोनई येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा कृतज्ञता पुरस्कार यंदा आंतरराष्ट्रीय विचारवंत डॉ.संदीप वासलेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा शनिवार दि. १४ मार्च रोजी सकाळी ९ वाजता नेवासा येथील पैस खांब मंदिरात पार पडणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी दिली.

महंत ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर), सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आश्रम, सुरेगाव गंगा (नेवासा बु.) तसेच ह.भ.प. वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (पैस खांब मंदिर), श्री क्षेत्र नेवासा यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

राज्यात सामाजिक क्षेत्रात रचनात्मक व समाजहिताचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. राज्यातील मोजक्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांमध्ये या पुरस्काराचा समावेश मानला जातो.

डॉ.संदीप वासलेकर यांची ओळख
डॉ. संदीप वासलेकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विचारवंत, लेखक आणि सार्वजनिक धोरणांचे विश्लेषक आहेत. ते मुंबईस्थित Strategic Foresight Group या थिंक-टँकचे अध्यक्ष असून जगभरातील सरकारे व संस्थांसोबत धोरणात्मक संवाद आणि समाधान-निर्मितीवर काम करतात. जागतिक शांतता, संघर्ष निराकरण, शासन व्यवस्था आणि भविष्यातील धोरण अभ्यास या विषयांवर त्यांनी व्यापक कार्य केले आहे.
त्यांनी तत्वज्ञान, राजकारण व अर्थशास्त्र या विषयांचे शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठातून घेतले असून मुंबई विद्यापीठातून एम.कॉम. पदवी प्राप्त केली आहे. 2011 मध्ये त्यांना ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ ही मानद पदवी बहाल करण्यात आली.
पाण्याच्या द्विपक्षीय प्रश्नांवर उपाय म्हणून त्यांनी ब्लू पीस फ्रेमवर्क विकसित केले असून पाणी संसाधनांद्वारे शांतता आणि सहकार्य वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या अहवालांचा संदर्भ ब्रिटनच्या संसदेत तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चांमध्येही देण्यात आला आहे.
शांतता, संघर्ष निवारण आणि जागतिक धोरणांवर त्यांनी जगभर व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या लेखनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दाद मिळाली आहे. मराठीत त्यांनी “एका दिशेचा शोध” आणि “युद्ध नाकारणारे जग” यांसारखी लोकप्रिय पुस्तके लिहिली आहेत. 2022 मध्ये सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमातही ते विशेष पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा प्रवास जिद्द आणि सातत्याचा असतो. त्यामुळे तरुण, विद्यार्थी, शेतकरी, डॉक्टर, वकील, शिक्षक, इंजिनिअर,अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच महिला नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे.
अवघ्या जगाला मार्गदर्शन करणाऱ्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या नेवासा येथील ऐतिहासिक पैस खांब मंदिरात जागतिक दर्जाचे विचारवंत डॉ. संदीप वासलेकर यांचा हा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याने कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!