नविदिल्ली
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
नावीन्यपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
डॉ.कविता नृसिंहराव गिट्टे (बीड), कुंदा जयवंत बच्छाव (नाशिक), वैभव वसंतराव कुलकर्णी (लातूर), शिवप्रसाद अरविंद टिंगरे (सातारा) महाराष्ट्रातील या चार शिक्षकांचा समावेश आहे.


