माय महाराष्ट्र न्यूज:भानसहिवरा प्रतिनिधी दि.07 श्रीकृष्ण जयंती व गोपाळ काल्याच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध असलेले भानसहिवरा येथील तीर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान येथे हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने शिनाई देवस्थानचे मठाधिपती राष्ट्रसंत श्री श्री 1008 महंत गुरुवर्य दिगंबर बाबाजी आराध्य व उत्तराधिकारी ज्योतिषाचार्य बालब्रम्हचारी महंत आवेराज जी महाराज यांच्या हस्ते विधीवत पुजा महाआरती करण्यात आली. यानिमित्ताने दिवसभर दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना शाबुदाना फराळाचे महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.

त्यानंतर रात्री ९.३० ते ११.३० वाजेपर्यंत महंत कंधारकर बाबा जालना यांचे श्रीकृष्ण जन्मावर किर्तन झाले, रात्री ठिक बारा वाजता राष्ट्रसंत श्री श्री 1008 गुरुवर्य महंत बाबाजी व उत्तराधिकारी महंत आवेराज जी महाराज, यांच्या हस्ते महाअभिषेक घालण्यात आला.रात्री बारा वाजता जन्मोत्सवाच्या वेळी पुजे चा मान उपसभापती श्री. किशोर भाऊ जोजार व शिनाई संतसेवक परीवार यांना मिळाला.हजारो भाविकांच्या उपस्थितीत पाळण्याची दोरी ओढून श्रीकृष्ण जन्मोत्सव लाहया सुंटुडा महाप्रसाद वाटप करुन पार पडला.
शनिवारी गावातून श्रीकृष्ण देवाच्या रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन गावातील सर्वच मंडळांच्या दहिहंड्या फोडण्यात आल्या. मिरवणूक देवस्थानच्या महाद्वारात आल्यानंतर दुपारी १२ वाजता मानाची काल्याची दहिहंडी राष्ट्रसंत श्री श्री 1008 महंत गुरुवर्य बाबाजी व उत्तराधिकारी महंत आवेराज जी महाराज यांच्या हस्ते फोडण्यात आली तर सर्व भाविक भक्तांना देवस्थान तर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले शिनाई संतसेवक व सर्वच गावातील तरुण मंडळांनी महाप्रसाद वाटप करण्याचे काम केले.
या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाला देवगड संस्थानचे राष्ट्रसंत महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री शंकरावजी गडाख , आमदार विठ्ठलराव लंघे , सुनिल भाऊ गडाख यांच्यासह राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन दिवसांच्या या श्रीकृष्णजन्माष्टमीच्या उत्सवात हजारो भाविकांनी तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान येथे हजेरी लावून दर्शन घेतले. कार्यक्रमाला सर्व संत महंत भक्त परिवार , आवेराज महाराज भक्त मंडळ,समस्त ग्रामस्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सहकार्य केले.देवस्थानचे उत्तराधिकारी महंत आवेराज जी महाराज यांनी सर्व उपस्थीत भाविक भक्तांचे आभार मानले.


