नेवासा/प्रतिनिधी
श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंदगिरी महाराज यांनी श्रीक्षेत्र देवगडला नुकतीच भेट दिली.
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे बुधवार दि.२८ ऑक्टोबर रोजी अवधेशानंदगिरी महाराज यांचे आगमन झाले. फटाक्यांची आतषबाजी, भक्तिमय वातावरण आणि भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भास्करगिरी महाराज आणि प्रकाशानंदगिरी महाराज यांनी अवधेशानंदगिरी महाराज यांचे स्वागत केले.
अवधेशानंदगिरी महाराज यांनी देवगड येथे भगवान दत्तात्रेय तसेच किसनगिरीबाबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रवरा नदीच्या घाट परिसरात गंगापूजन करण्यात
आले. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात मंदिर प्रांगणात मिरवणूक काढण्यात आली. भजनी मंडळे व डोक्यावर तुळशी कलश घेऊन सुवासिनी महिला भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते.
श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबांच्या तपश्चर्येने पावन झालेली भूमी, भगवान दत्तात्रेयांचे अधिष्ठान आणि भक्ती, श्रद्धेचा अनोखा संगम असलेले श्रीक्षेत्र देवगड हे अलौकिक स्थान आहे, अशा शब्दांत श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंदगिरी महाराज यांनी श्रीक्षेत्र देवगड चे वर्णन केले.देवगड मंदिर प्रांगणातील ज्ञानसागर सभामंडपमध्ये मिरवणुकीचा समारोप झाला. दर्शन व पूजनानंतर मार्गदर्शन करताना अवधेशानंदगिरी महाराज म्हणाले की जीवनात भगवंतांचे स्मरण, सत्याची जाणीव आणि अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित केले. श्रीक्षेत्र देवगड हे अलौकिक स्थान असल्याचे सांगताना त्यांनी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबांच्या तपश्चर्येचा गौरव केला.
जीवनात सुख-शांती हवी असेल, तर भगवंतांचे विस्मरण होऊ देऊ नका. माणसाला जीवनात सत्य आणि असत्य यांतील फरक समजला पाहिजे. भगवंतांचे सातत्याने स्मरण केल्याने जीवनाला योग्य दिशा मिळते आणि मनाला स्थैर्य प्राप्त होते, असा सदेश त्यांनी आपल्या प्रवचनातून दिला.
पवीत्र प्रवरा नदीचे दर्शन झाल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी श्रीक्षेत्र देवगडच्या आध्यात्मिक वातावरणाचेही कौतुक केले. भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानातील मंदिरे आणि परिसर आकर्षक पद्धतीने
विकसित करण्यात आल्याचे नमूद करत त्यांनी देवस्थानच्या कार्याची प्रशंसा केली.
या प्रसंगी कैलासगिरी महाराज, शिवानंदगिरीजी महाराज, रमेशानंदगिरी महाराज, किसन महाराज सुडके, जनार्दन महाराज मेटे, अतुल महाराज आदमणे, बाळू महाराज कानडे, गणेश महाराज शेजुळ, माजी आमदार पांडुरंग अभंग, मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, विश्व हिंदू परिषदेचे आप्पाजी बारगजे, अॅड. सुनील चावरे, बजरंग विधाते, बाळासाहेब पाटील, अजय साबळे आणि रुपेश विखोना यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


