पुणे/प्रतिनिधी
ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ.शिरीष हिरेमठ (वय ७५ वर्षे) यांचे यांचे गुरुवार दि.२९ रोजी रात्री नऊच्या सुमारास सोपान बाग येथील त्यांच्या राहात्या घरी निधन झाले.
गेल्या काही वर्षांपासून ते मेंदूतील गाठीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाने पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी आणि प्रतिष्ठित हृदयरोगतज्ज्ञ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
डॉ.हिरेमठ यांनी ४ दशकांहून अधिक काळ हृदयरोग उपचार क्षेत्रात काम केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी आणि १ लाखांपेक्षा अधिक अँजिओग्राफी केल्या होत्या. हृदयविकाराचे लवकर निदान, आधुनिक उपचारपद्धतींचा वापर आणि हृदयविकाराच्या रुग्णांवरील उपचारांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
‘रुबी हॉल’च्या प्रगतीत योगदान
डॉ.हिरेमठ यांनी पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर हृदयरोग/शास्त्रातील उच्च शिक्षण पूर्ण करून १९८२ मध्ये जोशी रुग्णालयातून त्यांनी हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे त्यांनी रुबी हॉल क्लिनिकसह पुण्यातील विविध रुग्णालयांमध्ये सेवा दिली. रुबी हॉल क्लिनिकच्या हृदयविकार उपचार विभागाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
भारतीय हृदयरोग संघटनेचे (कार्डिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया) अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. हृदयरोग उपचारांमधील प्रगती, नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि हृदयविकारांबाबत जनजागृती यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले.
रुबी हॉल क्लिनिककडून शोक
रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.पुरवेझ के. ग्रँट यांनी डॉ. हिरेमठ यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. हृदयरोग उपचार क्षेत्रातील त्यांच्या अनेक दशकांच्या योगदानामुळे संस्थेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात मदत झाली. त्यांच्या व्यावसायिक कौशल्याबरोबरच दयाळूपणा, संवेदनशीलता आणि रुग्णांप्रती असलेली आपुलकी यामुळे ते अनेकांच्या स्मरणात राहतील, असे डॉ. ग्रँट यांनी म्हटले.


