नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील देडगाव येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संविधान हे केवळ देश चालविण्याचे मार्गदर्शक पुस्तक नसून प्रत्येक नागरिकाला सन्मानाने, समानतेने आणि स्वातंत्र्याने जीवन जगण्याचा आधारस्तंभ आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अभिषेक घटमाळ उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची निर्मिती, त्याचे महत्त्व आणि संविधानातील मूलभूत मूल्यांविषयी अतिशय सुंदर व प्रभावी मार्गदर्शन केले. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे महत्त्व विशद करताना ही मूल्ये प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावीत, असे आवाहन केले. त्यांच्या मार्गदर्शनाबरोबरच सुमधुर बासरीवादन आणि सुंदर कविता गायनाने विद्यार्थ्यांना एक अनोखी सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. किशोर मुंगसे सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. सुभाष जाधव सर यांनी केले. यावेळी संविधानाचे महत्त्व आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांची भूमिका यावर त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमात अनेक विद्यार्थिनींनी संविधानाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक संविधान वाचन करून संविधानातील मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. प्रमुख पाहुणे श्री. अभिषेक घटमाळ सर यांचा विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. आर. बी. गायकवाड सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.
संविधानाचे महत्त्व समजून घेत त्यातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.


