भेंडा/नेवासा
महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रि शिक्षणा बरोबरच एकल (विधवा) महिलांचे विविध प्रश्न,सामाजिक समस्या सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण व भरीव कार्य केले असल्याचे प्रतिपादन संत गाडगेबाबा रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.रेणुका सचिन चौधरी यांनी केले.
संत गाडगेबाबा रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन संचलित साऊ एकल महिला समिती नेवासा तालुका यांचे वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले,त्यावेळी सौ.चौधरी बोलत होत्या. भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या मारुतराव घुले पाटील सभागृहात झालेल्या पुण्यतिथी कार्यक्रमात एकल महिला अनिता धाडगे,स्वाती फाळके व सौ.रेणुका चौधरी, सौ.जया कापसे यांचे हस्ते महात्मा फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
जलमित्र सुखदेव फुलारी, संत गाडगेबाबा फाऊंडेशनचे कारभारी गरड,भारत आरगडे,येडूभाऊ सोनवणे, सचिन चौधरी, बाबासाहेब गोर्डे आदी।यावेळी उपस्थित होते.
सौ.चौधरी पुढे म्हणाल्या की, महात्मा फुले यांनी एकल ( विधवा ) झालेल्या महिलेचे केश वपन करण्याची प्रथा बंद करण्यासाठी ब्राह्मणांचा संप घडवून आणणे, त्याप्रथेस विरोध करणे , एकल महिलांना अनैतिक संबंधातून झालेल्या बालकांचे संगोपन करणे, एकल महिलेवर अत्याचार झाल्यानंतर आत्महत्ये पासून त्यांना प्रवृत्त करण्यासाठी महिला सुधार गृह स्थापन करणे,तसेच महिलांना शिक्षणाचे प्रवाहात आणण्यासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम केले. महिला शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांना स्वतःच शिक्षित करून महिलांना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू करणे, सत्यशोधक समाजाची स्थापना करणे अशी समाजहिताची अनेक कामे हयातभर केली.
तालुक्यातील एकल महिलांसाठी विविध उद्योग व्यवसाय व रोजगार या बाबत महिलांनी संपर्क साधावा,असे आवाहन ही या वेळी करण्यात आले .


