माय महाराष्ट्र न्यूज:एक फेब्रुवारी पासून NCDEX मध्ये मक्यासाठी जून २०२४ व हळदीसाठी ऑगस्ट २०२४ डिलीवरीचे व्यवहार सुरू झाले. यामुळे NCDEX मध्ये मक्यासाठी फेब्रुवारी,
मार्च, एप्रिल व मे डिलीवरीचे तर हळदीसाठी एप्रिल व जून डिलीवरीचे व्यवहार चालू आहेत. MCX मध्ये कापसासाठी मार्चचे तर कपाशीसाठी फेब्रुवारी व एप्रिलचे व्यवहार चालू आहेत.
NCDEX ने आता जाहीर केले आहे की यापुढे मक्याचे व हळदीचे नवीन ऑप्शन ट्रेडिंग चालू केले जाणार नाही. सध्या मक्यासाठी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे डिलीवरीचे व हळदीसाठी एप्रिल व जून डिलीवरीचे
ऑप्शन ट्रेडिंग चालू आहे; ते कायम राहील. थोडक्यात, जे काही फ्युचर्स मार्केटमध्ये थोडेफार चालू आहे तेपण आता बंद केले जात आहे. ही काही चांगली गोष्ट नाही.या वर्षी सोयाबीनचे जागतिक उत्पादन १.०६ टक्क्यांनी व वर्ष-अखेर साठा १.१३ टक्क्यांनी वाढेल
असा अंदाज आहे. तसेच मागणीतील घसरण होत असल्याने सोयाबीनच्या किमती जागतिक स्तरावर घसरत आहेत. ऑगस्ट ते डिसेंबर या दरम्यान जागतिक किमती ९ टक्क्यांनी घसरल्या. तशीच परिस्थिती कापसाच्या बाबतीत आहे. या वर्षी कापसाचे जागतिक
उत्पादन ०.५ टक्क्यांनी व वर्ष-अखेर साठा ३.८ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. युरोपमधील मागणी कमी होत आहे. यामुळे किमती कमी होण्याचा अंदाज केला जात आहे. या सर्वांचा भारतीय बाजारावर काही प्रमाणात परिणाम होत राहील. या सप्ताहात कापूस,
हरभरा, सोयाबीन यांच्या किमती घसरल्या. तुरीच्या किमतीतील वाढीचा कल कायम राहिला. यंदा तुरीची आवक गेल्या वर्षापेक्षा कमी राहील असे दिसते. हळदीमधील तेजी कायम राहिली.
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात १.१ टक्क्यांनी घसरून रु. १,३७६ वर आले आहेत. फेब्रुवारी भाव रु. १,५३० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५३१ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ११.३ टक्क्यांनी अधिक आहेत.
हेजिंग करण्यासाठी या भावांचा विचार करावा. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट भाव यापेक्षा कमी आहेत पण फेब्रुवारी व एप्रिल भाव मात्र अधिक आहेत.
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात रु. २,२०० वर कायम आहेत. फ्युचर्स (फेब्रुवारी) किमती रु. २,२२१ वर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती रु. २,२४८ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती या सप्ताहात १.३ टक्क्यांनी घसरून रु. ५,६३५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे.
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) १.१ टक्क्यांनी वाढून रु. ८,९०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.
सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ४,७९८ वर आली होती. या सप्ताहात ती ३.७ टक्क्यांनी घसरून रु. ४,६२१ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.