माय महाराष्ट्र न्यूज:उत्तराखंडसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. समान नागरी संहिता विधेयक (UCC) आज विधानसभेत सादर करण्यात आले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हे विधेयक सभागृहात मांडले.
UCC संदर्भात अजेंड्यात बदल करण्यात आला आहे. आता UCC वर आज फक्त चर्चा होणार आहे. UCC चे पासिंग एक दिवसासाठी पुढे ढकलले जाऊ शकते. उत्तराखंडमध्ये उद्या UCC विधेयक मंजूर होऊ शकते.
मुख्यमंत्री धामी संविधानाची मूळ प्रत घेऊन सभागृहात पोहोचले आहेत. यावेळी आंदोलनकर्त्यांना १० टक्के आरक्षणाबाबत निवड समितीचा अहवालही सादर करण्यात आला.
समान नागरी संहिता विधेयक आणण्यासाठी सोमवारी उत्तराखंड विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी हे विधेयक मांडण्यात आले.
अधिवेशनासंदर्भात पोलिसांनी बंदोबस्त कडेकोट केला असून, संपूर्ण राज्यात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दुसरीकडे, हल्दवानीमध्ये मोठा पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. यूसीसीबाबत मुस्लिमबहुल भागात
कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. बनभूलपुरा, इंदिरा नगर, गांधी नगर, शनी बाजार या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एसपी सिटी, सीओ स्वत: परिसरात गस्त घालत आहेत.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी यूसीसीबाबत मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती, यामध्ये यूसीसीच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. विधानसभेचे अधिवेशन ५ ते ८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
आज सकाळीच हे विधेयक मांडण्यापूर्वी सीएम धामी म्हणाले की, देवभूमी उत्तराखंडमधील नागरिकांना समान अधिकार देण्याच्या उद्देशाने आज विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर केले जाणार आहे.
UCC लागू करण्याच्या दिशेने वाटचाल करणारे देशातील पहिले राज्य म्हणून ओळखले जाणे हा राज्यातील सर्व जनतेसाठी अभिमानाचा क्षण आहे.