माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्षात नाराज असून आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशोक चव्हाण आज विधानसभा
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राजीनामा सोपवण्यासाठीच अशोक चव्हाण राहुल नार्वेकर यांच्या भेटीला पोहोचले होते अशी माहिती आहे. गेल्या अनेक
दिवसांपासून काँग्रेसचा एक फुटणार असल्याच्या चर्चा आहेत. तसंच अशोक चव्हाणही पक्षात नाराज असून वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. त्यातच अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला
असून राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे.अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश घेणार असे दावे यापूर्वीच करण्यात आले होते. जुलै 2023 मध्ये शिवसेना पक्ष फुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी
अशोक चव्हाण यांच्याबद्दल दावा केला होता. अशा प्रकारचा दावा करणारे ते एकटे नव्हते. डिसेंबर 2023 मध्ये नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही अशोकराव चव्हाण भाजपमध्ये येणार असे संकेत दिले होते.
या सगळ्याबाबत अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण आले आहे. राहुल नार्वेकर यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असे अशोक चव्हाणांकडून
सांगण्यात आले. मात्र, आगामी राज्यसभा निवडणुकीच्यातोंडावर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असा जाणकारांचा होरा आहे. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. नांदेडच्या राजकीय वर्तुळातही
अशोक चव्हाण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ‘भावी खासदार’ असा उल्लेख करत अशोक चव्हाणांचे स्टेटस ठेवले आहेत.