माय महाराष्ट्र न्यूज:माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडूनही आता पक्ष सोडण्यास सुरूवात झाली आहे. चव्हाण
यांचे अहमदनगरमधील खंदे समर्थक आणि दीर्घकाळ पक्षाच्या विविध पदांवर काम केलेले काँग्रेसचे प्रदेश सचिटणीस विनायकराव देशमुख यांनीही पक्षाचा राजीनामा दिला.
देशमुख यांनी आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला आहे. चव्हाण यांच्या पाठापाठ तेही भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगण्यात येते.देशमुख यांनी पक्ष सोडण्याचे कोणतेही
कारण न देता अगदी तीन ओळीत आपल्या पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा पाठविला आहे. देशमुख हे चव्हाण यांचे खंदे समर्थक मानले जातात. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असताना चव्हाण यांच्याशी
नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देशमुख यांचे चांगले सख्य निर्माण झाले होते. नंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलत गेले, पण देशमुखांचे सरचिटणीसपद कायम राहिले. चव्हाण यांच्यामुळेच त्यांना ही संधी
मिळत गेल्याचे सांगण्यात येते. मात्र, आता चव्हाणांनी भाजपचे कमळ हाती धरल्याने देशमुखही काँग्रेस सोडतील अशी अपेक्षा होतीच. सुमारे ३२ वर्षांपासून देशमुख काँग्रेस कार्यकर्ते होते. आता नव्या पक्षात
राज्यस्तरीय राजकारणाचा विचार त्यांच्याकडून प्राधान्याने होण्याची शक्यता आहे.जिल्हातील काँग्रेसची जबाबदारी असताना देशमुख यांनी आपापल्या संस्थानात विभागलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना एकत्र
आणण्यासाठी प्रयत्न केले होते. नगर जिल्ह्याच्या विकासासाठी त्या काळात व्हिजन २०२० हे अभियान त्यांनी आणले होते. त्याला निमसरकारी स्वरूप मिळून त्यावर बरेच कामही झाले होते. मात्र, काँग्रेसची सत्ता गेल्यावर ते मागे पडले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी नाते आणि चांगले संबंध असलेल्या देशमुख यांनी नगरमध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही काम केले आहे. त्यांची शिक्षण संस्थाही आहे. विधान परिषदेच्या
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही त्यांनी लढविली होती, मात्र त्यात यश आले नव्हते.देशमुख नगर जिल्ह्यातील राजकारणात मंत्री विखेंचे समर्थक मानले जातात. राज्यस्तरावर जेव्हा चव्हाण
यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या, त्यावेळी जिल्ह्यात देशमुख यांचेही स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्याचे पहायला मिळाले. विधान परिषद निवडणुकीच्यावेळी आमदार
सत्यजित तांबे यांच्या बंडानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला होता. त्यावेळी तांबे आणि थोरात यांच्यावर कारवाई व्हावी, अशी अशी मागणी जोर धरीत होती. त्यामध्ये देशमुख यांनी ठाम भूमिका बजावली होती.