माय महाराष्ट्र न्यूज:फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात देशातील अनेक भागांमधून थंडी गायब झाली असून उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.
पश्चिम हिमालयातील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे बहुतांश राज्यांचे हवामान बदलले आहे. परिणामी आजपासून पुढील ३ ते ४ दिवस अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. पंजाब,
हरियाणा आणि दिल्लीमध्ये आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज (Rain Alert) आहे.पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशात १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता
वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उत्तर मध्य प्रदेशातही ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर काही भागात गारपीट होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.
देशाची राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्लीत १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. या संपूर्ण आठवड्यात दिल्लीचे किमान तापमान ९ ते ११ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २४ ते २७ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यातील अनेक भागातून थंडी गायब झाली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुढील काही
दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट होऊ शकते, असं आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे.