माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील बहुप्रतिक्षित शिक्षक भरती आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोचली आहे. पात्र अभियोग्यताधारकांना संस्था किंवा जिल्हा परिषदेतील नियुक्ती संदर्भात
संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून, त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेत आहोत, अशी माहिती
राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.पाच वर्षांहून अधिक कालावधीच्या प्रतीक्षेनंतर राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेला मुहूर्त सापडला आहे. सुमारे २१ हजार ६७८ रिक्त जागांसाठी ही जाहिरात
प्रसिद्ध करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी शिक्षण संस्थांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता नियुक्तीच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मात्र अभियोग्यता धारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल या प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण करत असल्याचे निरीक्षण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी नोंदविले आहे. ते म्हणतात
भरती प्रक्रियेत त्यांची फसवणूक करण्याची शक्यता काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे. अमुक जिल्हा परिषद मध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेत भरती करून देतो.जवळच्या संस्थेत नोकरी देतो,
अशी खोटी आश्वासने देऊन मागील भरतीच्या वेळी काही दलालांनी उमेदवारांची फसवणूक केली असल्याची बाब काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे.’’ संगणकाद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय
घेऊन काही मंडळी अशाप्रकारे अभियोग्यताधारकांची फसवणूक करू शकतात. त्या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे मांढरे म्हणाले. दरम्यान असा
खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती किंवा संपर्कातील व्यक्ती यांच्यावर पोलिस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.