माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये (BJP) जाणार अशा चर्चा सुरू आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील यांचे
भाचे आणि राष्ट्रवादीचे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की, नेमकी चर्चा काय सुरू आहे? जयंत पाटील एकटे जाणार की “सगेसोयरे” यांना
घेऊन जाणार असा प्रति प्रश्न पत्रकारांना केला आहे. जयंत पाटील यांनी या चर्चांचे खंडन केलं आहे असं देखील ते म्हणाले. आम्ही शरद पवार यांच्या सोबतच आहोत आणि भविष्यात देखील राहणार आहोत,
असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे. भाजप म्हणत की येऊ घातलेल्या निवडणुकीत आम्ही सर्वाधिक जागा जिंकू तर त्यांचे मूळ भाजपचे किती लोक आहेत हे त्यांनी सांगावं. आमच्याकडून त्यांच्याकडे गेलेले
किती लोक आहेत, हेही सांगावं असा टोला प्राजक्त तनपुरे यांनी लगावला आहे.नगरपालिका ,महानगरपालिका, जिल्हा परिषद, यांचे मागच्या दोन वर्षापासून इलेक्शन झालेले नाहीत.
या सर्व संस्था प्रशासक चालवत आहेत, जनतेतून आलेले प्रतिनिधी तिथे नाहीत. तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी एक चर्चा ऐकली आहे की राज्यातील सहकार विभाग असा एक कायदा
आणू पाहतय की, या संस्थांमधील संचालक मंडळ बरखास्त करून या सर्व संस्था अधिकाऱ्यांमार्फत चालवल्या जाणार आहेत तसं एक विधेयक येणार असल्याची चर्चा सुरू आहे असं आमदार प्राजक्त तनपुरे
यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भविष्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होतील की नाही अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येत आहे अस देखील तनपुरे यांनी म्हटल आहे.