माय महाराष्ट्र न्यूज:फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सध्या अनेक भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होत आहे. तर काही
भागांना वादळी वाऱ्यासह गारपीटीने जोरदार तडाखा दिला आहे. अवकाळीमुळे शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडला आहे. अवकाळीचं हे संकट पुढील काही दिवस कायम राहील,
असं हवामान खात्याने सांगितलं आहे.भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज म्हणजेच मंगळवारी (२७ फेब्रुवारी) आणि बुधवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या
कडकडाटासह मुसळधार पाऊस (Rain Alert) होईल. याचदरम्यान काही भागात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला.
आयएमडीने जारी केलेल्या अंदाजनुसार, मंगळवार २७ आणि बुधवार २८ फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील.
छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.याशिवाय विदर्भातील बुलढाणा , अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया,
चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी (२६ फेब्रुवारी) राज्यातील बहुतांश भागात अचानक पावसाने हजेरी लावली.