माय महाराष्ट्र न्यूज:पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन येत्या १५ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. सुमारे दीड महिना पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे.
मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.दररोज मोठ्या संख्येनं भाविक विठ्ठल
रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला (Pandharpur News) येत असतात. विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श व्हावे, अशी भाविकांची इच्छा असते. यासाठी ते तासंनतास रांगेत उभे राहतात.
सद्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.यासाठी राज्य सरकारने ७३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. आता देवाच्या गर्भगृहातील काम सुरू करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणीचे
सुमारे दीड महिना पदस्पर्श दर्शन बंद ठेवावे लागणार आहे. यासंदर्भात आज मंदिर समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार, येत्या १५ मार्चपासून सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत
भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे. दरम्यान दररोजचे देवाचे नित्य उपचार सुरू राहणार आहेत. दरम्यानच्या काळामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीचे संरक्षण व्हावे, यासाठी बुलेटप्रूफ काचेचे आवरण बसविण्यात
येणार आहे. भाविकांनी याची नोंद घ्यावी तसेच सहकार्य करावे, असं आवाहन देखील मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले.