माय महाराष्ट्र न्यूज:महायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर सुजय विखे यांची नगर दक्षिणेतून उमेदवारी जाहीर झाली असली तरी मागील पाच वर्षात
घडलेल्या विविध घटनांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतरच माझी नाराजी कोणत्या मुद्द्यांवर होती हे स्पष्ट करेन, असे प्रतिपादन विधान परिषदेचे
आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे केले. दरम्यान तिकीट एकदा जाहीर झाल्यावर पाचवेळा जाहीर माफी मागण्याची वेळ यायला नको होती, अशी सूचक टिपणीही प्रा. शिंदे यांनी विखेंचे नाव न घेता केली.
नगरच्या वाडिया पार्कमध्ये आयोजित राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील सामन्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.नगर दक्षिणेतून उमेदवारीसाठी मीही इच्छुक होतो, याआधीही दोन निवडणुकांच्या
काळात मी इच्छुक होतो. मात्र आता डॉक्टर विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कोणत्या निकषावर मला उमेदवारी मिळाली नाही, हे मला सांगता येणार नाही. मात्र डॉक्टर विखेंना उमेदवारी
मिळाल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या विजयासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याची ग्वाहीही जाहीरपणे दिलेली आहे, असे राम शिंदेंनी स्पष्ट केले.त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही माझ्याशी चर्चा केली. त्या चर्चेत मी काही
मुद्दे उपस्थित केले होते. त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतल्याचे समजले. मात्र फडणवीस यांच्याकडून मला काहीही अजूनपर्यंत निरोप नाही, पण नाराजी संदर्भात मी
उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर फडणवीस यांच्या स्तरावरच चर्चा होईल. त्यानंतर ते मुद्दे काय होते ते मी स्पष्ट करेल. मागील चार-पाच वर्षात झालेल्या विविध घटना व मुद्द्यांचे निरसन होणे आवश्यक आहे, असे सूचक भाष्यही प्रा. शिंदे यांनी केले.