माय महाराष्ट्र न्यूज:मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल होत आहे. कधी उन्हाच्या झळा, तर कधी अवकाळी
पावसाच्या सरी कोसळत आहेत. सध्या देशातील काही राज्यांमध्ये पावसासह गारपीट होत आहे. पुढील ४८ तासांतही अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होऊ शकते, असं
हवामान खात्याने सांगितलं आहे.भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, आज रविवारपासून पुढील ५ दिवस अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा
येथे विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. २५ मार्च रोजी उप-हिमालयीन पश्चिम
बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर २६ मार्चला आसाम आणि मेघालयमधील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. गंगेच्या पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये होळीच्या दिवशी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा वाढून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. दिल्ली एनसीआरमध्ये कमाल
तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६-१७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील विदर्भाकडील गोंदिया, गडचिरोली या भागांमध्ये
मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली होती. मात्र, दोन दिवसांपासून विदर्भातील हवामानात बदल होताना दिसत आहे. सध्या विदर्भातील पाऊस थांबला असून यामुळे तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे येत्या २७ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात उन्हाचे चटके जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही तापमानाचा पारा वाढणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.