माय महाराष्ट्र न्यूज:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा बोलबाला आहे. या योजनेसाठी एक कोटींहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तसंच योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे.
समाजातील सर्व समाज घटकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीचे हे सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळीत दिली. त्याचप्रमाणे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे
बहिणींच्या खात्यात 10 ऑक्टोबरपर्यंत देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी जनसन्मान यात्रेत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचं आयोजन परळी शहरात करण्यात आलं होतं. लाडक्या बहिणींच्या सशक्तिकरणाच्या दृष्टीने तसेच परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील
लाडक्या बहिणींशी आणि नागरिकांशी अजित पवार यांसह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संवाद साधला. शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील मैदानात अभूतपूर्व सभा पार पडली.यावेळी बोलताना अजित पवार यांनी सांगितलं की, आम्ही लोकांना वाऱ्यावर सोडत नाही.
आपल्याला विकास साधायचा असेल तर बीड-परभणीमध्ये विमानतळ होणं अत्यावश्यक आहे. तरच एमआयडीसी, कारखानदारीत रोजगार निर्मिती होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणारा पक्ष आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ‘लाडकी बहिण योजने’चे पैसे आम्ही 10 आँक्टोबरपर्यंत देणार आहोत.
हे पैसे स्वतः साठी वापरा. तर ही योजना महिलांना सन्मानांनी राहाता यावे यासाठी आणली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.