माय महाराष्ट्र न्यूज:आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. अशातच, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर टीका
करण्यासाठी आयत कोलीत हाती लागलंय. दरम्यान (दि.13) महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात परिवर्तन होण्याचा दावा केला.पत्रकार परिषदेत शिंदे सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता राजकीय परिवर्तनासाठी आतुर झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या
निकालात जनतेची ही भावना दिसून येईल, असा आम्हाला विश्वास आहे. सध्याच्या सरकारपासून आम्हाला जनतेची मुक्तता करायची आहे, असे ते म्हणाले.शरद पवार पुढे म्हणाले की, देशातील सर्वोत्तम मानले जाणारे राज्य प्रशासन महायुतीच्या
राजवटीत खचले आहे. आम्हाला सध्याच्या सरकारपासून जनतेची मुक्तता करायची आहे आणि ते आम्हाला साथ देतील याची मला खात्री आहे. महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभा
निवडणुकीतील कामगिरीची पुनरावृत्ती करेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने अलीकडे ज्या प्रकारचे निर्णय घेतले आहेत, ते सर्वसामान्यांची चेष्टा करण्यासारखे आहेत. आम्ही लोकांना या सरकारपासून मुक्त
करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करत आहोत आणि मला आशा आहे की लोक आम्हाला साथ देतील. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना ही फसवी आहे, या योजनेसाठी अर्थसंकल्प आणि आर्थिक तरतूद याबाबत स्पष्टता नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.