माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये २१५ जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित ७३ जागांचे वाटपही येत्या तीन दिवसात अंतिम होईल, असे काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी बोलताना सांगितले. ज्या २१५ जागा निश्चित झाल्या आहेत.
त्यात काँग्रेसला ८४, तर शरद पवार गट आणि उद्धवसेनेला प्रत्येकी ६५ जागा देण्यात आल्या आहेत. एक जागा सपाच्या अबू आझमी यांची अंतिम करण्यात आली आहे.आज बुधवारी दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक होणार आहे. त्यानंतर
दोन दिवसांच्या आत ३० लोकांची पहिली यादी काँग्रेसकडून जाहीर केली जाणार आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, मधुसूदन मिस्त्री यांच्यासोबत रमेश चेन्नीथला, महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत. या २१५ जागा सर्व सहमतीने अंतिम करण्यात आल्या आहेत, असे सांगून तो नेता म्हणाला, उर्वरित ७३ जागीदेखील मित्र पक्षांसह
आघाडीतील तीन प्रमुख पक्षांच्याही जागा असतील. ७३ जागांचा अंदाज बघितला, तर सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील, असे चित्र आहे. विदर्भात काँग्रेससाठी, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी, तर मराठवाड्यात ठाकरे यांच्या शिवसेना आणि काँग्रेससाठी
जास्त जागा देण्यात आल्या आहेत. मुंबई आणि कोकणात उद्धवसेनेला इतर दोन पक्षांच्या तुलनेत जास्त जागा देण्यात येतील, असेही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद असल्याच्या बातम्या येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर
महाविकास आघाडीने २१५ जागा निश्चित करून उत्तर दिल्याचेही ते म्हणाले. आघाडीची गेल्या सहा दिवसांपासून थांबलेली जागावाटपाची चर्चा आता गुरुवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार
येत्या २२ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. बैठकीत सर्व जागांचे वाटप होण्याची शक्यता कमीच आहे. १० ते १५ जागांवर शेवटपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहील, असे आजचे चित्र आहे.