माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील
राजकारणाला वेग आला आहे. या निवडणुकीत आरक्षणाचा विषय गेम चेंजर ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच आचारसंहिता
लागताच मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत लढायचे
की पाडायचे, याचा अंतिम निर्णय समाजाला विचारून घेतला जाणार आहे. त्यासाठी २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान राज्यातील मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक होणार आहे. तत्पूर्वी समाजाकडून अर्ज करणाऱ्या इच्छुकांशी चर्चा केली जाणार
असल्याची माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली. तसेच महामंडळांची घोषणा आणि योजना हा केवळ दिखावा आहे. १८ पगडजाती कोणासोबत आहेत, ते तुम्हाला लवकरच कळेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. या
घडामोडींमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेली मनोज जरांगे यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असल्याचे सांगितले जात आहे.मध्यरात्री सुमारे २ वाजता भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची
अंतरावली सराटीत भेट घेतली. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची आठ दिवसात दुसऱ्यांदा भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मात्र गुलदस्त्यात असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच मनोज जरांगे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून बोचरी टीका करत आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे.