माय महाराष्ट्र न्यूज:”पीएम किसान डॉट एपीके’ ही फाइल डाऊनलोड करताच एका ३६ वर्षीय व्यक्तीच्या खात्यातून तब्बल २ कोटी ४८ लाख १५६ रुपये काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अविनाश रोतळे (वय ३६) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून, सायबर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.दत्त मंदिर, कुंभारवाडा परिसरात राहणारे अविनाश रोतळे हे एका व्हॉट्सॲप ग्रुपवर आहेत.
त्यांना या ग्रुपवर ‘पीएम किसान डॉट एपीके’ ही फाइल प्राप्त झाली होती.पीएम किसान योजनेशी संबंधित माहिती किंवा इतर बाबींशी निगडित हे ॲप असावे, असा समज रोतळे यांचा झाला. त्यातूनच त्यांनी फाइलवर क्लिक
करून ती आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करून घेतली.त्यानंतर हे ॲप त्यांनी रीतसर इन्स्टॉल देखील केले. त्यानंतर काही वेळातच सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाइलवर ताबा मिळवीत त्यांच्या खात्यातून तब्बल २ कोटी ४८ लाख १५६ रुपये
दुसऱ्या खात्यात वळते केले.पैसे खात्यातून डेबीट झाल्यास मेसेज मोबाइलवर येताच अविनाश रोतळे यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ सायबर पोलिसात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे.
कोणतीही लिंक ओपन करू नका’‘:पीएम किसान डॉट एपीके’ अशा प्रकारच्या कोणत्याही ॲपची लिंक ओपन करू नये, असे आवाहन या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने केले आहे. पीएम किसानच्या सर्व प्रकारच्या माहितीसाठी केंद्र शासनाचे पोर्टल आहे.
त्यावरून अपेक्षित माहिती मिळविण्याचा प्रयत्न करावा, असेही विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी सांगितले.