शेवगाव/सुखदेव फुलारी
शेवगाव तालुक्याचे खंबीर नेतृत्व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी गुरुवार दि.२४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यामृत मुहुर्तावर २२२- शेवगाव – पाथर्डी मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे सोबत माजी आ. नरेंद्र घुले पाटील, काकासाहेब नरवडे, अरुण लांडे उपस्थित होते.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी ७ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहे. मतदारसंघात आतापर्यंत १० व्यक्तींनी १३ नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते यांनी दिली.
गुरुवारी दि.२४ रोजी ७ व्यक्तींनी अर्ज विकत घेतले असून आजअखेर अर्ज विकत घेतलेल्या व्यक्तींची संख्या ८३ झाली आहे. तर गुरुवारी विद्यमान आ. मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, अॅड. प्रतापराव ढाकणे, प्रभावती ढाकणे, हर्षदा काकडे, दिलीप खेडकर, रत्नाकर जावळे अशा सात व्यक्तींनी नामनिर्देशन दाखल केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मते यांनी सांगितले.
यावेळी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक उपस्थित होते.
गुरुवारी गुरुपुष्यामृत मुहूर्त साधून अनेक मातब्बरांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जनशक्ती विकास आघाडीच्या माजी जि.प.सदस्य हर्षदा काकडे यांनी शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. काकडे समर्थकांच्या रॅलीने शेवगाव गजबजून गेल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले. आ. राजळे यांनी पाथर्डी रस्त्यावरील योग तज्ञ दादाजी वैशंपायननगर येथील श्री दत्तात्रयाचे दर्शन घेऊन साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. घुले यांनी बसस्थानक चौकातील श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पसंती दिली.