नेवासा
नेवासा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिली जिल्हास्तरीय तपासणी झालेल्या २७६ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या ३३१ मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली. निवडणूक निरीक्षक अरुण कुमार, निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थिती ही प्रक्रिया करण्यात आली.
नेवासा तहसील येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सोनाली म्हात्रे , नगरपालिका मुख्याधिकारी तथा समन्वयक अधिकारी विशाल यादव , नायब तहसीलदार किशोर सानप , सुरेश भांगे व बी. ए. कसार आदी उपस्थित होते.
नेवासा विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ३३१ बॅलेट युनिट, ३३१ कंट्रोल युनिट आणि ३५८व्हीव्हीपॅट यंत्रांची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकारी उंडे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.
नेवासा विधानसभा मतदार संघासाठी मतदान केंद्राच्या १२० टक्के प्रमाणात बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १३० टक्के प्रमाणात व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त झाली आहेत. ही यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. दुसरी सरळमिसळ प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना स्ट्रॉंग रूममध्ये घेऊन जाऊन दाखविण्यात आली. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ही यंत्रे मतदानाच्या दृष्टीने तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे, असे श्री. उंडे यांनी सांगितले.