अहिल्यानगर/सुखदेव फुलारी
राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि सनदी अधिकारी, लेखक, व्याख्याते शेखर गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘प्रशासकीय योगायोग’ या ‘प्रौढ
वाङ्मय-विनोद’ या प्रकारातील
पुस्तकाला जाहीर झालेला हा पुरस्कार एक लाख रुपयांचा आहे.
महाराष्ट्र शासनाने २०२३ च्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा शुक्रवारदि.७ फेब्रुवारी रोजी केली. प्रौढ वाङ्मय-विनोद या प्रकारात श्री. शेखर गायकवाड यांच्या ‘प्रशासकीय योगायोग’ या पुस्तकाची निवड करण्यात आली. १ लक्ष रुपये रोख रक्कम, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गायकवाड यांना गौरविण्यात येणार आहे.
यापूर्वी त्यांना ‘शेतीचे कायदे’ या पुस्तकासाठी २००६ मध्ये महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. सध्या ते ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक असून, गेल्या तीन दशकांपासून वेगवेगळ्या विषयांवर सातत्याने लिखाण करत आहेत. त्यांची आतापर्यंत सुमारे तीन डझन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
प्रशासनातही आपल्या कार्यशैलीचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या श्री. गायकवाड यांनी लेखन प्रांतातही आपली खास ओळख निर्माण केली आहे. एवढे विपुल लेखन करणारे ते एकमेव सनदी अधिकारी आहेत.