नेवासा
आदर्शगाव हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोनई येथील स्मार्ट किड्स विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या ‘अद्वितीय कलाविष्कार’ कार्यक्रमास पालक व परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पद्मश्री पवार यांचे आगमन होताच सुवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. विद्यालयाचे संस्थापक परेश लोढा यांनी स्वागत केले. प्रसिद्ध रणजी क्रिकेट खेळाडू अनुपम संकलेचा अध्यक्षस्थानी होते. प्राचार्या सोनल लोढा यांनी प्रास्ताविक भाषणात शैक्षणिक, क्रीडा विषयाचे धोरण व सादर होणा-या सामाजिक कार्याची माहिती दिली. निधी लोढा यांनी अहवाल वाचन केले. तुषार संकलेचा व लोढा परिवाराने मान्यवरांचा सत्कार केला.
प्रमुख भाषणात पद्मश्री पवार यांनी स्मार्ट किड्स विद्यालय पहिल्याच भेटीत भावल्याने आज येताना हिवरेबाजार येथील सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थांना शाळा दाखविण्यास बरोबर घेऊन आल्याचे सांगून आम्ही आमचे अनुभव सांगतो मात्र विद्यालयाने आपली शैक्षणिक पद्धत आमच्या गावात येऊन सांगावी असे आवाहन केले. शिक्षक त्यांची भुमिका योग्य पध्दतीने करीत असताना पाल्यांच्या आई व आजीने रोज उजाळा घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. मोबाईल व अन्य वाईट सवयीवर त्यांनी प्रबोधन केले. सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी व क्रिकेटपटू संकलेचा यांचे भाषण झाले. आनंदवन सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले व मुळा बँकेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब निमसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह,चषक व बक्षीसांचे वितरण करण्यात आले. अद्वितीय कलाविष्कार मध्ये सादर करण्यात आलेल्या उद्योगपती रतन टाटांना श्रध्दाजंली गीत सर्वांना भावले. याशिवाय मोबाईल दुष्परिणाम, मल्लखांब व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यास गीत सादरीकरणातून वाहवा करण्यात आली. विद्यार्थीनी इश्वरी दरंदले, अपर्णा बनकर,स्वरा दहातोंडे, तनिष्का दरंदले,सई दरंदले व श्रेया चांदघोडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. उदघाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवनाथ शिंदे व गणेश हापसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व नृत्य दिग्दर्शकांनी विशेष परिश्रम घेतले.