मुंबई दि.७
जलसंपदा विभागाच्या योजनांच्या कामांचे अन्वेषण व सर्वेक्षण करण्याचे काम यापुढे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ही कामे गतीने केले जातील, असे जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.
मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले, गुगुळ प्रवाही वळण योजनेतून मांजरपाडा धरणाद्वारे गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्यात येणार आहे. या योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून गुगुळ प्रवाही वळण योजनेच्या अन्वेषण व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणेचे काम प्रगतीपथावर आहे.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी 30 प्रवाही वळण योजनांची कामे विविध टप्पावर प्रगतीपथावर आहेत. याद्वारे 7.40 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे नियोजन आहे. यापैकी 14 प्रवाही वळण योजनांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेली असून याद्वारे 1.08 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येत आहे. तसेच 8 प्रवाही वळण योजना बांधकामाधीन असून याद्वारे 2.09 टीएमसी पाणी व 8 प्रवाही वळण योजना प्रस्तावित आहेत. याद्वारे 4.23 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यांत वळविण्याचे नियोजन आहे. या 30 योजनांपैकी पायरपाडा, ता. दिंडोरी, जि. नाशिक या योजनेस उर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. ही योजना पश्चिम वाहिनी असलेल्या पार नदीच्या स्थानिक नाल्यांवर असुन त्यांचे पाणी सदर वळण कालव्यांद्वारे पूर्वेकडील उर्ध्व गोदावरी खोऱ्यायातील करंजवण धरणात वळविण्यात येणार आहे. सदर योजने करिता आवश्यक भूसंपादन पूर्ण करून योजनेच्या कामात सुरुवात करण्यात येत आहे.
प्रस्तावित पार-तापी-नर्मदा प्रकल्प रद्द झाल्याने पाणी उपलब्ध होत आहे. सदर पाणी पार-गोदावरी योजनेकरिता अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने तलांकनिहाय मर्यादा न ठेवता सविस्तर अभ्यास करून अहवाल शासनास सादर करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पूढील कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर प्रगतीत असल्याचेही मंत्री श्री. विखे – पाटील यांनी सांगितले.
या संदर्भात सदस्य छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता.