नेवासा
आगामी रामनवमी, ईद व डॉ.आंबेडकर जयंती बंदोबस्त शांततेत सुव्यवस्थेत होण्यासाठी नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील नेवासा शहर, कुकाणा, नेवासा फाटा या ठिकाणी रॅपिड ऍक्शन फोर्स (शीघ्र कृती दल) व जिल्हा पोलीस यांचा संयुक्त रूट मार्च घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
शुक्रवार दि. 21 मार्च रोजी सकाळी 10.30 ते 12.45 या वेळेत हा संयुक्त रूट मार्च झाला.सदर रूट मार्च करीता नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस ठाणे नेवासाकडील 6 अधिकारी व 26 पोलीस अंमलदार तसेच रॅपिड ऍक्शन फोर्सचे 102 बटालियन, द्रुत कार्य बलाच्या सहायक कमांडंट श्रीमती प्रियंका सिंह परिहार त्यांच्या सोबत निरीक्षक दत्तात्रय मोहिते, जनसंपर्क अधिकारी श्री. धनंजय गुजर यांचेसह 34 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. सदरचा रूट मार्च हा लक्ष वेधून घेणारा ठरला. सदर रूट मार्चचा सकारात्मक परिणाम दिसून आला. रूट मार्च मुख्यतः सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना व विश्वास निर्माण व्हावा व गुन्हेगारांवर नियंत्रण राहावे हा होता.
सदरचा रूट मार्च पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.