शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव-नेवासा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसामुळे पिकांचे व घरांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी नुकसानग्रस्ताना तातडीने मदत मिळावी यासाठी निवेदन दिले.
मागील आठवड्यात तालुक्यातील शहरटाकळी, दहिगांवने व परिसरात व इतर गावांतून झालेल्या वादळ व पावसाने यामध्ये १००पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले, खूप ठिकाणी तारी तुटल्या, केळीच्या बागा भुईसपाट झाल्या, कांद्याचे शेडमध्ये पाणी शिरल्याने कांद्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. तर अनेकांच्या घराचे पत्रे उडून गेले. सोलर प्लेटाचे ही मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. दहिफळ येथे बैलगाडीवर झाड पडल्याने मिराबाई अशोक भोसले वय ५७ या महिलेचा मृत्यु झाला. या पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकरी व नागरिकांना तातडीने मदत करण्याची मागणी शिंदे यांच्या कडे करण्यात आली. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,माजी आमदार पांडुरंग अभंग, अशोक मिसाळ, काशिनाथ नवले, दादा गंडाळ, तुकाराम मिसाळ, शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नाना पाटील मडके, गणेश खंबरे, मंगेश थोरात, भारतराव मोटकर, हनुमान पातकळ, संतोष धस, संतोष पावसे, यांसह पदाधिकारी उपस्थित होते.