नेवासा, दि. ८
नेवासा येथे उभारण्यात येत असलेल्या पोलीस स्टेशनच्या कामाची राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. पोलीस दलाच्या सक्षमतेवर अधिक भर दिला जात असून, इमारतीचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
४ कोटी ४४ लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या पोलीस स्टेशनच्या इमारतीत तळमजल्यात पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक कक्ष, पोलीस अंमलदार कक्ष, पुरुष व महिला कोठडी, चौकशी कक्ष, सीसीटीव्ही कक्ष, पुरुष व महिला स्वच्छतागृह, पासपोर्ट कार्यालय, हॉल व पँट्री अशी सुविधा असून, पहिल्या मजल्यावर सभाकक्ष, रेकॉर्ड कक्ष, मुद्देमाल कक्ष, पुरुष व महिला विश्रांती कक्ष, निर्भया व हिरकणी कक्ष यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच या इमारतीसाठी सुरक्षा भिंत, अंतर्गत रस्ते, बाग, फर्निचर सुविधा व पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.