भेंडा/नेवासा
सरकार जागे होईल की नाही माहित नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांना जागा करत आहोत. शेतकरी जागा झाला तर सरकारला गावात येऊन जागे व्हावे लागेल एवढी शेतकऱ्यांची ताकद आहे आणि माझा शेतकऱ्यांना विश्वास आहे
असा आशावाद प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी व्यक्त केला.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे प्रहारचे उत्तर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधतांना बच्चुभाऊ कडू बोलत होते.
प्रहारचे युवक जिल्हाध्यक्ष अड.पांडुरंग औताडे,जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले, जिल्हा संघटक जालिंदर आरगडे, जिल्हा आर्मी प्रमुख रघुनाथ आरगडे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाखरे, अरविंद आरगडे,जिल्हा संघटक सचिन साबळे, युवक शहर प्रमुख रामहरी शिरसाट, सोमनाथ सांगळे, बंडू आरगडे, शेखर आरगडे,
सोमनाथ सांगळे,अड.माधव काळे,दत्तात्रय खाटीक,अड.रविंद्र गव्हाणे,नामदेव निकम, डॉ.संतोष फुलारी, डॉ. ईश्वर उगले, रामचंद्र गंगावणे,नागेश आघाव,वामन औटी,
आदि यावेळी उपस्थित होते.
शेतकरी कर्जमाफी व दिव्यांगांच्या प्रश्नावर बोलतांना श्री.कडू पुढे म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांना जागा करत आहोत सरकार जागे होईल की नाही माहित नाही मात्र शेतकरी जागा झाला तर सरकारला गावात येऊन जागे व्हावे लागेल एवढी शेतकऱ्यांची ताकद आहे आणि माझा शेतकऱ्यांना विश्वास आहे म्हणून गावच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना जागृत करण्याचे काम करत आहे.जो आज जाती धर्मात विभागलेला आहे, पक्षाचा गुलाम होऊन काम करतं त्याला त्याच्या गुलामीतून बाहेर काढायचा आहे.
“मी शेतकरी” म्हणून त्याला उभं करायचा आहे,जेव्हा शेतकरी म्हणून आमचा शेतकरी उभा राहील तेव्हा बच्चूकडूची गरज पडणार नाही, तेवढाच त्याच्या मागचा आमचा संदर्भ आहे,निवडणुकीचा नाही.
आम्ही ज्या ज्या गावात जातोय तिथे लोकप्रचंड प्रतिसाद देत आहेत.
जर आम्ही कष्ट केले, प्रामाणिकपणा दाखवला आणि इमानदारीने उभे राहिलो तर आज कधी जमा न होणारा शेतकरी आज आमच्या बाजूने उभा राहील असा मला आत्मविश्वास आहे. मात्र त्यासाठी आमचे कष्ट आणि त्याग लागेल. समर्पित भावना ठेवून काम केल्यास त्यागाच्या भूमिकेतूनच हा शेतकरी उभा राहील. थोडा वेळ लागेल पण उभा राहील, तेव्हा इतका खंबीर राहील तर त्याला बच्चूकडूची गरज पडणार नाही. आम्ही पोट न भरलेल्या लोकांसाठीच काम करतोय, पोट भरलेले लोक आमच्याकडे येणारच नाहीत. जे उपाशी आहेत ते आमच्या बाजूने येतील.
*गुवाहटीला गेलेले सारे निवडून आले, मी एकटाच पडलो…*
मागील सरकारमध्ये तुम्ही राज्यमंत्री होता, त्याच्यानंतर तुम्ही गुवाहटीला गेलात,सध्याचे सरकार आणण्यात तुमचा मोठा वाटा होता, तरी आज बच्चुभाऊ एकाकी पडल्यासारखे दिसत आहेत यावर काय सांगाल ? असा प्रश्न विचारल्यावर श्री कडू म्हणाले की,
तुम्ही हा प्रश्न अजित दादाला विचारत नाही, हा प्रश्न उद्धव ठाकरेला विचारत नाही, आम्ही बरे आहे गरीब. आम्हालाच विचारले. तुम्ही सांगा गुवाहटीला गेले ते सारे निवडून आले,मी एकटाच पडलो असे सांगताच उपस्थितांमध्ये प्रचंड हशा पिकला.
दिव्यांग मंत्रालय स्थापन करू शकलो ते ही तोड़के नाही असे ही त्यांनी म्हंटले.