शेवगाव/प्रतिनीधी
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत सहा व पाच टक्के सेस मधून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी तीन योजनांची निवड करण्यात आली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी येत्या २६ सप्टेंबर २०२५ पर्यंत लाभार्थ्यांनी परिपुर्ण प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी केले आहे.
या वर्षी पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या ३२ लाभार्थी मुलांनाही सायकल खरेदीसाठी अनुदान ( प्रत्येकी अनुदान ६०५० रूपये ) मिळणार आहे. तसेच ३५ मुलींना सायकल अनुदान ( प्रत्येकी अनुदान ६०५० रूपये ) मिळणार आहे. ग्रामिण भागातील शेतक-यांनासाठी १० स्प्रिंकलर ( प्रत्येकी अनुदान ३० हजार ३६० रूपये) व ३० स्प्रे पंप ( प्रत्येकी अनुदान ९ हजार २०० रूपये ) खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजना अनु. जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग व नवबौद्ध घटकांतील लाभार्थ्यांसाठी आहेत. दिव्यांगासाठी दिव्यांग – दिव्यांग विवाह करणा-या दोन जोडप्यांना प्रत्येकी ३० हजार रूपयांचे अनुदान, १२ दिव्यांगांना पिठगिरणीसाठी प्रत्येकी १३ हजार ५०० रूपये अनुदान तसेच ३ दिव्यांगांना झेरॉक्स मशीनसाठी प्रत्येकी ५२ हजार रूपयांच्या अनुदानाचा लाभ दिला जाणार असल्याचे गटविकास अधिकारी शहा यांनी सांगीतले.
योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी यांना कळविण्यात आले आहे. गावातील सुचना फलकावर याबाबत माहिती देण्याबरोबरच गावात व वाड्या- वस्तींवर दवंडी देण्यास सांगीतले असून लाभार्थ्यांनी परिपुर्ण प्रस्ताव येत्या २६ सप्टेंबर २०२५ अखेर पर्यंत पंचायत समितीकडे पाठवावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी केले आहे.




