अहिल्यानगर, दि. २५
भारतीय हवामान विभागाने २८ व २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जलसंधारण, जलसंपदा, बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा परिषद पाटबंधारे विभाग यांसह सर्व आपत्तीशी संबंधित विभागांनी एकमेकांत समन्वय ठेवून अतिवृष्टीपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशा सूचना राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या.
अतिवृष्टीमुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील शेतपीक, शेतजमीन तसेच इतर नुकसानीची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पी. बी. गायसमुद्रे आदी उपस्थित होते.
मागील ६० वर्षांत न झालेल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या दोन्ही तालुक्यातील सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिकांचे नुकसान झाले, बंधारे फुटले, पुलांची पडझड झाली. पाण्याच्या दबावामुळे जुने पाझर तलाव गळतीस लागले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील पूलाच्या बाजू खचल्या आहेत.
अतिवृष्टीने बाधित सर्व क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिथे थेट प्रत्यक्ष पाहणी करणे शक्य नाही, अशा ठिकाणच्या क्षेत्राचे ड्रोनद्वारे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व जमिनीचे पुनर्भरण करण्यासाठी शेतकऱ्यांना गाळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
आपत्तीच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी धैर्य सोडू नये. या आपत्तीला धीराने सामोरे जावे. येत्या दहा दिवसांत सर्व अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रांचे पीक पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही श्री. विखे पाटील यांनी दिली.
पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव, पाथर्डी, मोहटा, कारेगाव, करंजी व परिसर, तसेच शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव, भायगाव व परिसरातील गावांची पालकमंत्र्यांनी गुरुवार, दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री उशिरापर्यंत पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत पालकमंत्र्यांनी त्यांना धीर दिला.




