नेवासा/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची एक अग्रणी शाखा असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण महापारेषण कंपनीच्या बाभळेश्वर विभाग अंतर्गत २२० के.व्ही भेंडा(सौंदाळा ) विज उपकेंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सेवा पंधरवडा
साजरा करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वॉटर फिल्टर व शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले.

२२० केव्ही विज उपकेंद्रातील कर्मचारी, अधिकारी विद्युत सहाय्यक व सुरक्षा रक्षक यांनी स्वयंस्फूर्तीने वर्गणी गोळा करून सामूहिक पद्धतीने जिल्हा परिषद शाळा संभाजीनगर कॉलनी ता. नेवासा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून २५ लिटर क्षमतेचे वॉटर फिल्टर व सोबत पाणी साठविण्यासाठी पाण्याची टाकी तसेच संबंधित प्लंबिंग व इलेक्ट्रिकचा खर्च करून एक अनोख्या पद्धतीने हा सेवा पंधरवाडा सप्ताह साजरा केला.
महापारेषण कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या कार्यकारी संचालक विभाग तथा अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाने यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि.१७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि.२ ऑक्टोबर पर्यंत महापारेषण कंपनीतील कर्मचारी व अधिकारी वर्गाने सेवा पंधरवाडा सप्ताह हा स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा व राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा असे।आवाहन परिपत्राव्दारे केलेले आहे.
या परिपत्रकानुसार नाशिक परी मंडळाच्या २२० केव्ही भेंडा (सौंदाळा) येथील कर्मचारी अधिकारी वर्गाने जिल्हा परिषद शाळांमधील समस्यांचे सर्वेक्षण करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर कॉलनी ता. नेवासा येथील एकूण २९ पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये वॉटर फिल्टरची सुविधा उपलब्ध केली. यापूर्वी शाळेतील लहान मुले पाण्यासाठी वॉटर बॅग घेऊन येत होते. परंतु शाळेची वेळ सकाळी दहा ते पाच असल्यामुळे हे पिण्यासाठी आणलेले वॉटर बॅग मधले पाणी पुरेसे नव्हते. ही बाबा लक्षात घेऊन शुद्ध पाण्याचे पेयजल उपलब्ध व्हावे, म्हणून ही सुविधा उपलब्ध केल्यामुळे परिसरातील नागरिक व कर्मचारी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक यांच्याकडून आनंद व्यक्त केला जात आहे आणि महापारेषण कंपनीचे आभार मानले जात आहे.
या सामाजिक उपक्रमासाठी मुख्य अभियंता संजीव भोळे, अधीक्षक अभियंता अशोक मडावी यांचे मार्गदर्शन लाभले. २२० केव्ही भेंडा उपकेंद्र प्रमुख शंतनु सूर्यकर व बाभळेश्वर येथील कार्यकारी अभियंता उज्वल पाटील, नगरसेवक जितेंद्र कुऱ्हे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद वाघ, इम्रान शेख, ज्ञानेश्वर टेकाळे उपस्थित होते.
तसेच बाभळेश्वर विभागाकडून उज्वल पाटील यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसी प्रकाश योजना नव्हती, त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन करताना अडचणी निर्माण होत होत्या ही अडचण निदर्शनास येताच तातडीने त्यांनी जिल्हा परिषद शाळेमधील वर्गासाठी प्रकाश योजना व वायरिंगची व्यवस्था करून दिली आणि शाळेतील रिकाम्या आवारामध्ये वृक्षारोपण सुद्धा करून दिले आणि शालेय वस्तूचे वाटप केले. अशा पद्धतीने सर्वच ठिकाणी वीज पारेषण कंपनीकडून सेवा पंधरवाडा सप्ताह साजरा व्हावा अशी अपेक्षा सर्व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




