नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने नोव्हेंबरचे पहिले पंधरवाड्यात गाळप केलेल्या ऊस बिलाची प्रतिटन ३ हजार रुपये प्रमाणे पहिली उचल संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी दिली
अधिक माहिती देताना श्री.शेवाळे म्हणाले की, कारखान्याचा सन २०२५-२६ चा ऊस ऊस गळीत हंगाम सोमवार दि.३ नोव्हेबर पासून सुरू झाला. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,कारखाना उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस तोडणी-वहातुक यंत्रणा व कारखान्याचे सर्व विभागात समन्वय साधत पूर्ण क्षमतेने दैनंदिन ऊस गाळप सुरू आहे.
दि.७ डिसेंबर अखेर ३५ दिवसात ३ लाख ८ हजार ६७० मे. टन ऊस गाळप करून २ लाख ४५ हजार २०० साखर पोत्यांची निर्मिती केली आहे.
३१.५ मेगावॉट सहवीज निर्मिती प्रकल्पातून ३२ दिवसांत १ कोटी ८१ लाख ७७ हजार ८५९ युनिट वीज निर्माण झाली असून त्यापैकी १ कोटी ८ लाख ८५ हजार ३२० यूनिट विज महावितरण कंपनीला निर्यात करण्यात आली आहे.
तसेच डिस्टिलरी विभागातील प्रतिदिन १ लाख लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पा मधून ३० दिवसांमध्ये २५ लाख ९२ हजार १७७ लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे.
दि.१४ ऑक्टोबर रोजी झालेल्या ५२ व्या गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदिपन कार्यक्रमात कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी या हंगामात गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपयांची पहिली उचल देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पहिली उचल संबधीत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करणारा ज्ञानेश्वर कारखाना अहिल्यानगर जिल्ह्यात अग्रेसर ठरला आहे.
सभासद,ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस ज्ञानेश्वर कारखान्यालाच देऊन उत्पादन वाढीस हातभार लावावा असे आवाहन ही श्री. शेवाळे यांनी केले आहे.


