नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे सुरू असलेल्या मुळा उजवा कालव्याच्या सिमेंट अस्तरीकरणास शेतकऱ्यांचा विरोध असून सौंदाळा, भेंडे बुद्रुक व भेंडे खुर्द गावातील शेतकऱ्यांनी सोमवार दि.८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कुकाणा येथील मुळा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता कार्यालयावर मोर्चा काढून विरोध नोंदविला.पाटबंधारे विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने मोर्चा मागे घेण्यात आल्याचे सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले.
भेंडा बुद्रुक,भेंडा खुर्द व सौंदाळा गावाच्या मध्यावरून जाणाऱ्या मुळा उजवा कालव्याला सिमेंट काँक्रेट अस्तरीकरनाचे काम झाल्यास या तिन्ही गावातील विहिरींचा नैसर्गिक पाझर बंद होऊन पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. सदर कॅनॉलसाठी सौंदाळा गावातील जमिनी संपादित केलेल्या आहे. परंतु सौंदाळा गाव उंचीवर असल्यामुळे पाण्याचा थेट लाभ गावास मिळत नाही. कॅनॉलच्या पाण्यावर आजूबाजूला शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेकडो विहिरीं खोदल्या, पाईपलाईन केल्या आहे. त्या सर्व कॅनॉलच्या पाझरावर अवलंबून आहे. त्यामुळे हे अस्तरीकरण झाल्यास,विहिरींमध्ये होणारा नैसर्गिक पाझर पूर्णतः बंद होईल. तिन्ही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनेल. शेकडो एकर क्षेत्रावरील बागायती शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होईल.शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन आत्महत्ये शिवाय पर्याय राहणार नाही जनावरांचे पाणी, शेतीपूरक व्यवसाय व रोजगार धोक्यात येतील अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी पाटबंधारे विभागा पुढे मांडली.
वरील सर्व मागण्या घेऊन तरुण व महिला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी मोर्चात लेखी आश्वासन देण्याची आक्रमक मागणी केल्याने उपविभागीय अभियंता स्वप्नील देशमुख यांनी वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा व प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी करून कालवा अस्तरीकरण बाबत निर्णय होईपर्यंत काम बंद ठेवण्यात येईल, परंतु कालवा स्वच्छतेचे काम सुरु राहील तसेच निवेदनातील प्रमुख आंदोलन कर्त्यांशी व सौंदाळा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय पुढील काम सुरू करणार नाही असे लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे, वैभव नवले, सोपान महापूर,नामदेव निकम,राजेंद्र चामुटे,बाळासाहेब आरगडे , कॉ.भारत आरगडे, कॉ.अप्पासाहेब वाबळे,रघुनाथ आरगडे,बाळासाहेब झावरे,वसंत बोधक,सौ.श्रध्दा आरगडे आदींची यावेळी भाषणे झाली.
आंदोलनास डॉ.शिवाजी शिंदे,अशोक वायकर, डॉ.संतोष फुलारी,बापूसाहेब नवले,भिवसेन गरड,बबन आरगडे, सचिन आरगडे,गणेश आरगडे,संजय गोरे,रामकिसन चामुटे , मधुकर आरगडे, किशोर मुरकुटे,निलेश आरगडे, अनिल आरगडे, राजेंद्र तारडे, मछिंद्र आरगडे, ज्ञानदेव चामुटे यांचे सह शेकडो शेतकरी उपस्थित होते.


