Thursday, February 12, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यातील ३५३२ शाळांमध्ये शाळा तेथे वाचनालय व कुसुमाग्रज वाचन अभियान’

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्हयामध्ये जिल्हा परिषदेच्या ३५३२ शाळा असून १८९१०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
बालपणापासूनच मुलांमध्ये आनंददायी वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी १४ फेब्रुवारी पासून जिल्ह्यातील ३५३२ शाळांमध्ये राबविणार ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या पुढाकारातून घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेने काढलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे की,वाचन ही व्यक्तीच्या बौध्दिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाची मूलभूत गरज असून विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजात वाचन संस्कृती दृढ होणे आवश्यक आहे. व्यक्तीची उन्नती, समाजाचा विकास व राष्ट्राच्या उत्कर्षासाठी वाचन आवश्यक आहे. बोलली जाणारी भाषा मुले नैसर्गिकरित्या शिकतात पण वाचन जाणीवपूर्वक शिकले पाहिजे. भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दि.१५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. बालपणापासूनच मुलांमध्ये आनंददायी वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

सध्याच्या डिजीटल युगात स्क्रीन टाईम वाढून विद्यार्थ्यांची वाचनाची सवय निश्चितच कमी झालेली आहे. मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे आजचा विद्यार्थी अवांतर वाचनापासून दुरावत चालला आहे. त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व जडण-घडणीवर झाल्याचे दिसून येत आहे. अवांतर वाचनाने विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह नैसर्गिकरित्या वाढून भाषिक व संवाद कौशल्य विकसित होते. विद्यार्थ्यांची एकाग्रता व विचार क्षमता वाढून ते नवनिर्मितीक्षम बनतात. विद्यार्थी तणावमुक्त होऊन आनंदी व उत्साही राहतात. पर्यायाने त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढून त्याचा सकारात्मक परिणाम त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासावर होतो. संस्कारक्षम पिढी घडवायची असेल तर विद्यार्थी दशे पासूनच वाचन आवश्यक आहे. वाचनाची सवय वृध्दिंगत करण्यासाठी सद्यस्थितीत अहिल्यानगर जिल्हयातील निवडक जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘पासवर्ड वाचन’ उपक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. शासनामार्फत सुरु असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेमार्फत सुरु असलेल्या ‘माझी आदर्श शाळा या उपक्रमात विद्यार्थी व शिक्षकांच्या वाचनास महत्त्वाचे स्थान दिले आहे.

अहिल्यानगर जिल्हयामध्ये जिल्हा परिषदेच्या ३५३२ शाळा असून १८९१०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सद्यस्थितीत काही शाळांमध्ये ग्रंथालयात विद्यार्थी व शिक्षकांसाठी पुरेशी पुस्तके उपलब्ध आहेत, सर्वच शाळांमध्ये समृध्द वाचनालय असणे आवश्यक आहे.राज्य शासनामार्फत २४ फेब्रुवारी हा ‘कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच केंद्रशासनाने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. याचे औचित्य साधून विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी वर्ष २०२५-२६ मध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये दि. १४ फेब्रुवारी २०२६ पासून ‘कुसुमाग्रज वाचन अभियान हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे.

*उपक्रमाची उद्दिष्टये…

१. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये व पर्यायाने भावी नागरिकांमध्ये वाचनाची सवय निर्माण व वृध्दिंगत करणे.
२. वाचनाच्या माध्यमातून भाषा कौशल्य, आकलन क्षमता व चौध्दिक विकासास चालना देणे.
३. दर्जेदार, मूल्याधिष्ठित व ज्ञानवर्धक साहित्याच्या वाचनास प्रोत्साहन देणे.
४. स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक प्रगती व व्यक्तिमत्त्व विकासासाठी पूरक वाचनास चालना देणे.
५. विद्याथी उत्तीर्ण होणे व प्रथम श्रेणीत येण्यासाठी आवश्यक असलेली वाचनक्षमता विकसित करणे.
६. डिजीटल माध्यमांच्या अतिवापरावर मर्यादा आणि पुस्तक वाचनाची संस्कृती रुजविणे.
७. शालेय तसेच सार्वजनिक ग्रंथालयांचा नियमित व प्रभावी वापर वाढविणे.
८. समाजात आजीवन शिक्षणाची भावना निर्माण करुन वाचन संस्कृती दृढ करणे.
९. वाचनाद्वारे नैतिक मूल्यांची रुजवण करुन चांगले संस्कार घडविणे.

*सहभागी घटक…

विद्यार्थी, शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी, पालक, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ.

*उपक्रमाची कार्यवाही…

समृध्द शालेय ग्रंथालयात प्रत्येक विद्यार्थ्यामागे ५ पुस्तके व प्रत्येक शिक्षकामागे २५ पुस्तके असणे आवश्यक आहे. शालेय ग्रंथालयात विविध प्रकारच्या पुस्तकांचा समावेश असावा. यामध्ये कथा, काव्य, ललितलेख, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, प्रवासवर्णने, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, लोकसाहित्य, संत साहित्य व बालसाहित्य यांचा समावेश असावा. बालसाहित्यात साहसी कथा, बोधकथा, निसर्ग वर्णने, परी कथा, लोक कथा, बडबडगीते, चित्रपुस्तके, ऐतिहासिक कथा, विज्ञान कथा, लघुकथा, बालनाट्य, मासिके यांचा समावेश असावा. शालेय ग्रंथालयासाठी उपयुक्त निवडक पुस्तकांची यादी यासोबत जोडली आहे. शाळांनी आवश्यकतेनुसार या यादीतील तसेच याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या वयोगटास अनुसरुन पुस्तकांची उपलब्धता शाळास्तरावर करावी. ज्या शाळांच्या ग्रंथालयात पुरेशी पुस्तकांची उपलब्धता नाही तेथे लोकसहभाग, ग्रामपंचायत निधी या माध्यमातून पुस्तकांची उपलब्धता करुन घ्यावी. सदर पुस्तकांची नोंद नोंदवही क्र.५ शालेय ग्रंथालय नोंदवहीमध्ये घ्यावी.

ग्रंथालयातील उपलब्ध पुस्तकांचे वयोगटानुसार (प्राथमिक, उच्च प्राथमिक स्तर) वर्गीकरण करावे. शाळेत अतिरिक्त वर्गखोली उपलब्ध असल्यास सदर खोलीची स्वच्छता व पुरेशी प्रकाशव्यवस्था करुन वाचनालय तयार करावे. लोकसहभाग, ग्रामपंचायत निधी, शिक्षक सहभागातून तसेच माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून वाचनालयात पुरेसे फर्निचर (कपाट, टेबल, खुर्चा, बेंचेस, बस्कर पटटया, स्टूल इ.) उपलब्ध करावे तसेच वाचनालयाचे सुशोभीकरण (फलेक्स, चित्र, पोस्टर्स, घोषवाक्य) करावे. या उपक्रमाला ग्रामसभा, शाळा व्यवस्थापन समिती, पालक सभा तसेच वृत्तपत्र, समाजमाध्यमाद्वारे व्यापक प्रसिध्दी द्यावी.
दि.१४ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व शाळांनी ग्रंथ दिंडीचे आयोजन करावे. वाचनाचे महत्त्व विषद करणारी घोषवाक्ये, फलक याद्वारे जनजागृती करावी. १०० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या सर्व शाळांमध्ये तसेच प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत गावातील शाळेत किमान एक बाल वाचनालय व शिक्षक वाचनालयाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ यांचे उपस्थितीत करणे अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त इतरही शाळांमध्ये वाचनालय सुरु करण्यास कोणताही प्रत्यवाय नाही. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वाचनाची सवय नियमित ठेवण्यासाठी या अभियानांतर्गत खालील प्रमाणे कार्यवाही करावी.

*रिडींग बेल…

वाचनासाठी शाळेच्या वेळापत्रकात आठवडयातून दोन तासिका निश्चित कराव्यात. यात प्रामुख्याने शनिवारी वेळापत्रकातील दुसरी तासिका व सोमवारी वेळापत्रकातील AEP किंवा भाषा विषयाची तासिका निश्चित करावी. या वाचन तासिकेची माहिती प्रत्येक वर्गात तक्त्यावर प्रदर्शित करावी. या तासिकांना शाळेत रिडींग बेल / वाचनाची घंटा दयावी व त्यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी वाचन करावे. निवडलेले पुस्तक वाचून पूर्ण होईपर्यंत सदरचे पुस्तक विद्यार्थ्याला उपलब्ध करुन द्यावे.

*सारांश लेखन…

वाचन तासिकेनंतर विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाचा सारांश इ.२ री पासून पुढे वर्गशिक्षकांनी लिहून घ्यावा, यासाठी स्वतंत्र वही विद्यार्थ्यांना ठेवण्यास सांगावी. सारांश लेखनाचा नमुना यासोबत जोडला आहे. विद्यार्थ्यांनी लिहीलेल्या सारांशाचे शिक्षकांनी अवलोकन करावे व आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

*आनंददायी शनिवार…

प्रत्येक शनिवारी वाचनावर आधारीत सारांश लेखन, वाचलेल्या पुस्तकावर चर्चा, चित्र रेखाटन, कथा-कथन, नाटयीकरण, शब्दभेडया, शब्दकोडे वाचनावर आधारीत आंनददायी कृती / खेळ यासारख्या कृती घ्याव्यात, विद्यार्थ्यांच्या दर्जेदार लेखन साहित्यास शालेय वार्षिकात / वृत्तपत्रात प्रसिध्दी द्यावी.

*समृध्द परिपाठ…

शालेय परिपाठात नियमितपणे विद्यार्थ्यांच्या वयोगटाला अनुसरुन एखादया पुस्तकाचे दहा मिनिटे क्रमशः वाचन घ्यावे. सदरचे वाचन शिक्षक किवा विद्यार्थी यांनी सर्वांसमक्ष करावे, तसेच शिक्षकांनी जुन्या कविता व साहित्याविषयी विद्यार्थ्यांसोबत सोप्या भाषेत चर्चा करावी.

*विद्यार्थी गैरव…

वर्गातील जो विद्यार्थी सर्वाधिक पुस्तकांचे वाचन करेल त्याचा दरमहा मुख्याध्यापकांनी सन्मान करावा.

*वाचन चळवळ…

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग घ्यावा. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये वाचनाच्या अनुषंगाने उपक्रमांबाबत चर्चा करावी. पालक मेळाव्यांमधून पालकांना मार्गदर्शन करुन त्यांचा सहभाग घ्यावा. शाळेमध्ये वृत्तपत्रे उपलब्ध करुन घ्यावीत.

*समूह साधन केंद्रस्तरावर ग्रंथालय…

समूह साधन केंद्र समन्वयक यांनी पुढाकार घेऊन केंद्रातील शिक्षकांच्या साहाय्याने समूह साधन केंद्रात शिक्षक वाचनालयाची निर्मिती करावी. वाचनालयात फर्निचर व मुबलक पुस्तकांची उपलब्धता असावी. वाचनालयातील प्राप्त पुस्तकांची नोंद केंद्रप्रमुखांनी स्वतंत्र रजिस्टरमध्ये ठेवावी. शिक्षकांनी केंद्रस्तरावरील ग्रंथालयातून पुस्तके आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करुन घ्यावीत. केंद्रस्तरावर पुस्तकांची देव-घेव नोंदवही असावी. केंद्रस्तर शिक्षण परिषदांमध्ये वाचलेल्या पुस्तकांचे समीक्षण करावे. शिक्षकांनी देखील सारांश लेखनाच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे.

*तालुकास्तर व्याख्यानमाला…

महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये दरवर्षी व्याख्यानमाला घेण्यात येतात व यास मोठी परंपरा आहे. या व्याख्यानमालांमध्ये सुप्रसिध्द लेखक, कवी व वाचनाची आवड असलेले मान्यवर यांची व्याख्याने आयोजित केली जातात. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक व वैचारिक देवाण-घेवाण होत असते. याच धर्तीवर शिक्षण विभागातील अधिकारी यांनी तालुक्यातील इतर वाचनप्रेमींना सोबत घेऊन दरवर्षी ठरावीक ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ही व्याख्यानमाला २-३ दिवसांची असावी व यासाठी मराठी साहित्यातील सुप्रसिध्द लेखक, कवी व वाचनप्रेमी मान्यवरांना आमंत्रित करण्यात यावे.

हा उपक्रम राबविणेची व यशस्वी करणेची जबाबदारी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची राहील.
‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ या उपक्रमास सर्व स्तरावरुन व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी. जेणेकरुन शाळांमधून व समाजामध्ये वाचन चळवळ उभी राहील.

-सुखदेव एकनाथ फुलारी
मु.पो.भेंडा,ता.नेवासा
मो.नं.९४२३७४९२७५

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!