Wednesday, April 22, 2026

उजनीवर धरणावर फ्लेमिंगोंचे आगमन

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

सोलापूर/प्रतिनिधी

उजनी धरणाचे खास आकर्षण असलेले फ्लेमिंगो हे नजाकतदार परदेशी पक्षी नुकतेच येऊन दाखल झाल्याची नोंद पक्षी अभ्यासकांनी केली आहे. सुमारे २०० हून अधिक संख्येतील फ्लेमिंगो धरण परिसरात येऊन दाखल झाल्यामुळे पक्षीप्रेमी व पर्यटकांमध्ये उत्साह संचारला आहे.

युरोपीय देशांमध्ये मूळ वास्तव्याला असलेले हे दिमाखदार पक्षी हिवाळ्यापूर्वी भारत व पाकिस्तान या देशांच्या सीमेवरील गुजरातच्या कच्छ भागात वीण घालतात. या ठिकाणी नवीन पीढीला जन्म घातल्यानंतर नवजात पिल्लांसह भारताच्या प्रवासावर निघतात. पांढरेशुभ्र परंतु गुलाबी छटा असलेले पंख, आखुड वक्राकार केशरी चोच, गुलाबी रंगाचे लांब पाय तसेच बाकदार मान हे वैशिष्ट्य असणारे फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी सध्या करमाळा तालुक्यातील कुगाव, केडगाव, सोगाव, वाशिंबे, कोंडार चिंचोळी, टाकळी, कात्रज, डिकसळ, कर्जत तालुक्यातील खानोटा, इंदापूर तालुक्यातील पळसदेव इत्यादी गावांच्या शिवारात पसरलेल्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर विहार करताना नजरेस पडत आहेत.

जानेवारी महिन्याच्या मध्यावधीत उजनी धरणातून नदी, बोगदा व कालव्यातून दहा टीएमसी पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आले. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर या पक्ष्यांचा जमिनीचा चराऊ भाग उघडा पडत गेल्याचा अचूक अंदाज घेत, स्थलांतरात अतिशय तरबेज असलेले रोहित पक्षी या ठिकाणी येऊन दाखल झाले आहेत.

*फ्लेमिंगोंचे वैशिष्ट्य…
सुमारे पाच ते साडेपाच फूट उंचीच्या पांढरेशुभ्र परंतु गुलाबी छटा असलेले पंख, आखुड व वक्राकार केशरी चोच, गुलाबी रंगाचे लांब पाय तसेच बाकदार मान हे फ्लेमिंगोंचे वैशिष्ट्ये आहेत. या पक्ष्यांचा पंखाखालील भाग रक्तवर्णीय असतो व ते आकाशात झेप घेतल्यानंतर गडद लाल रंगाचे पंख ज्वाळाप्रमाणे दिसतात. या कारणामुळे या पक्ष्यांना अग्निपंख या नावाने संबोधतात. ज्या वेळी हे पक्षी उथळ पाण्यात उभारलेले असतात तेव्हा ते गुलाबी रंगमिश्रित धवलवर्णीय दिसतात व या कारणामुळे त्यांना रोहित पक्षी या नावाने ओळखतात.

*यंदा तब्बल दोन महिने उशीरा आगमन…

या वर्षी परतीच्या प्रवासाच्या वेळी प्रचंड प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे धरण काठोकाठ भरले होते; शिवाय या वर्षी धरणाच्या लाभक्षेत्रातील भूजल पातळीही समाधानकारक असल्याने धरणातील पाण्याचे विसर्ग लांबणीवर पडल्याने तुडुंब भरून होते. त्यामुळे या पक्ष्यांना खाद्यान्न उपलब्ध होत नव्हते. या कारणामुळे हे पक्ष्यांनी आपल्या प्रवासाचे वेळापत्रक बदलून आगमन लांबणीवर टाकले गेल्या महिन्यात भीमा नदीतून व कालव्याद्वारे सिंचनासाठी केलेल्या पाण्याच्या विसर्गानंतर जलाशयाचा काठ उघडा पडून तेथे दलदल निर्माण झाल्याने फ्लेमिंगो आपल्या उदरनिर्वाहासाठी सरसावले आहेत.

*डॉ.अरविंद कुंभार(ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक)

उजनी वरील पक्षांचे निरीक्षण व नोंदी घेण्यासाठी मी कित्येक वर्षांपासून उजनीच्या पाणलोट क्षेत्रावर फिरत आहे. वर्षभरात अनेक वेळा उजनीला भेट देऊन तेथील पक्ष्यांच्या अधिवासाचा अभ्यास करतो. स्थलांतरित पक्षी नेहमी हवामानाचा अंदाज घेत धरण परिसरात येत असतात. यावर्षी ऋतुचक्र अनियमित होऊन रोहित पक्ष्यांच्या स्थलांतरावर परिणाम झाला होता. सतत बदलणाऱ्या हवामानातही फ्लेमिंगो उजनी वर येऊन दाखल झाल्याने उजनीचे सौंदर्य वाढले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!