नेवासा/प्रतिनिधी
भारतीय आध्यात्मिक गुरु गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त दि.१५ मे रोजी
सांयकाली ६:३० वाजता अहिल्यानगर शहरातील बंधन लॉन्स येथे आर्ट ऑफ लिव्हिंग अहिल्यानगर जिल्हा परिवार, वारकरी सांप्रदाय व धार्मिक-सामाजिक क्षेत्रातील भाविकांनी विश्वशांतीसाठी आयोजित केलेल्या सामुदायिक पसायदान गायन व स्वरमयी भजन उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री क्षेत्र देवगडचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धव महाराज मंडलिक-नेवासेकर यांनी केले आहे.
*महंत भास्करगिरिजी महाराज…*
भाविकांना आवाहन करतांना गुरुवर्य महंत भास्करगिरिजी महाराज म्हणाले की, संत कोणत्या जातीचा, पंथाचा, परिसराचा किंवा देशाचा नसतो. विश्वातील सर्वांचे कल्याण व्हावे, दुःखी कोणी असू नये हिच सर्व संतांची भावना असते. भारत भूमी ही संतभूमी,तीर्थभूमी आणि देवभूमी आहे, हा त्रिवेणी संगम हा फक्त भारतातच पाहायला मिळतो. त्यातीलच एक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी महाराज आहेत. अंतकरणातील सद्भाव, समाजसेवा, इशसेवा हेच त्यांच्या कार्यातून पाहायला मिळत-मिळणार आहे.
त्यांच्या ७० व्या जन्मोत्सवानिमित्त
अहिल्यानगर शहरात पसायदान सामूहिक गायन व स्वरमयी भजन उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्सहात पार पडणार आहे. संगीत आपल्याला अंतर्मुख करत असते आणि मन स्थिर होण्यासाठी मदत करते, असा हा मोठा पसायदानाचा कार्यक्रम सर्व जाती धर्मातील बांधवांना बरोबर घेऊन श्रद्धेने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
*महंत उद्धव महाराज मंडलिक…*
महंत उद्धव महाराज मंडलिक म्हणाले की, अहिल्यानगर शहरात आर्ट ऑफ लिविंग परिवार, वारकरी संप्रदायाच्या वतीने एकत्र येऊन पूज्य संत श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या ७० व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून नेवासा येथे प्रकट झालेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथ व त्यात ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वशांतीसाठी मागितलेल्या पसायदानाचे सामूहिक गायन करण्यात येणार आहे. जवळपास ११ हजार नागरिक-भाविक एकत्र येऊन एकसुरात पसायदान गायन करणार आहेत,भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय किर्तीचे भजन गायक विक्रम हाजरा यांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.


